स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चांना अचानक ब्रेक लागल्यानंतर सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. प्री-वेडिंग सोहळ्यांचे फोटो व्हायरल झाल्याने चाहत्यांना त्यांच्या लग्नाच्या दिवशीची उत्सुकता चढली होती. मात्र लग्नाच्या एक दिवस आधीच लग्न पुढे ढकलल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला यामागे स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीचे कारण दिले गेले, पण नंतर परिस्थितीने वेगळाच वळण घेतले.
सोशल मीडियावर मेरी डिकोस्टा नावाच्या तरुणीसोबत पलाशच्या कथित फ्लर्टी चॅट्सचे स्क्रिनशॉट्स समोर आल्यानंतर स्मृती–पलाश नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा होऊ लागली. याच वेळी मेरी डिकोस्टाच्या नावाने एक नवीन पोस्ट व्हायरल होत असून त्यात तिने अनेक खुलासे केल्याचा दावा केला आहे.

काय आहे व्हायरल चॅट –
व्हायरल पोस्टनुसार, मेरीने स्वतःच चॅट्स पोस्ट केल्याचे सांगितले आहे, तसेच तिला आपली ओळख उघड करायची नव्हती असेही म्हटले आहे. ती सांगते की हे चॅट्स मे ते जुलै 2025 दरम्यानचे असून त्यांचा संवाद फक्त महिनाभरच सुरू होता. ती पलाशला कधीच भेटली नसल्याचेही स्पष्ट करते. लोक तिच्यावर हे मुद्दाम उघड केल्याचा आरोप करत असल्याचे तिने नमूद केले असून तिने हे सर्व स्मृतीची प्रशंसक असल्यामुळे केले असल्याचे म्हटले आहे. तिचे मत आहे की पलाशचा खरा चेहरा लोकांसमोर यायला हवा होता. तसेच, सोशल मीडियावर तिच्याबद्दल पसरलेल्या गैरसमजांमध्ये ती कोरिओग्राफर नसल्याचेही तिने सांगितले. वाढत्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे तिला आपले अकाउंट प्रायव्हेट करावे लागल्याचेही ती म्हणते.
कथित स्क्रिनशॉट्सनुसार, मे 2025 मधील एका मेसेजमध्ये पलाशने मेरीला एकत्र पोहायला जाण्याचा प्रस्ताव दिल्याचे दिसते. त्यावर मेरीने त्याचे रिलेशनशिप स्टेटस विचारले असता, पलाश उत्तर टाळत असल्याचे दिसते. तो विषय चुकवून संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे. याच चॅट्समुळे स्मृती आणि पलाशच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि लग्न पुढे ढकलावे लागल्याची कुजबुज वाढली.
स्मृतीने लग्नाचे फोटो काढून टाकले –
लग्न पुढे ढकलल्याची घोषणा झाल्यानंतर स्मृतीने आपल्या प्री-वेडिंग सोहळ्यांचे सर्व फोटो सोशल मीडियावरून हटवले आहेत. यामुळे पलाशने स्मृतीला फसवल्याची चर्चा आणखी जोरात रंगत आहे. संपूर्ण प्रकरणावर स्मृती मानधना किंवा पलाश मुच्छल यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि तर्क-वितर्क कायम आहेत.











