रणवीर सिंग कडून ‘कांतारा’तील देवीचा ‘भूत’ म्हणून उल्लेख सोशल मीडियावर संतापाची लाट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणताना दिसतात की त्यांनी कांतारा चॅप्टर 1 थिएटरमध्ये पाहिली आणि ऋषभचा परफॉर्मन्स अप्रतिम होता. विशेषतः जेव्हा चामुंडी देवी पात्रातील दैवी शक्ती नायकामध्ये प्रकट होते, तो सीन त्यांनी ‘भूत’ म्हणून संबोधला

गोव्यात झालेल्या IFFI 2025 च्या क्लोजिंग सेरेमनीत अभिनेता रणवीर सिंह यांनी ‘कांतारा चॅप्टर 1’विषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमाला दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीसह रणवीरही उपस्थित होते. ऋषभच्या अभिनयाची त्यांनी भरभरून स्तुती केली; मात्र क्लायमॅक्स सीनची नक्कल करताना त्यांनी देवीला ‘भूत’ असे संबोधल्याने सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नाराजीची लाट उसळली.

काय म्हणाला रणवीर सिंग

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणताना दिसतात की त्यांनी कांतारा चॅप्टर 1 थिएटरमध्ये पाहिली आणि ऋषभचा परफॉर्मन्स अप्रतिम होता. विशेषतः जेव्हा चामुंडी देवी पात्रातील दैवी शक्ती नायकामध्ये प्रकट होते, तो सीन त्यांनी ‘भूत’ म्हणून संबोधला. त्यानंतर त्यांनी त्या सीनचे अनुकरणही केले, ज्यावर ऋषभ शेट्टी हसताना दिसले. रणवीरने मजेत प्रेक्षकांना विचारले की त्यांना ते कांतारा 3 मध्ये पाहायला आवडेल का.

सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

रणवीरचे हे वक्तव्य अनेकांना आक्षेपार्ह वाटले. सोशल मीडियावर लोकांनी हे विधान अपमानास्पद असल्याची टीका केली. एका यूजरने लिहिले की एका अभिनेत्याला काय बोलावे हे माहित असणे आवश्यक आहे आणि देवीला ‘भूत’ म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. दुसऱ्या यूजरने हे वक्तव्य अत्यंत गैर असल्याचे सांगून रणवीरने शब्द वापरताना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला. काहींनी स्पष्टपणे म्हटले की देवीला भूत म्हणणे हा सांस्कृतिक अनादर आहे.

‘कांतारा चॅप्टर 1’ ही 2022 च्या ब्लॉकबस्टर ‘कांतारा’ची प्रीक्वल असून या चित्रपटाचे दिग्दर्शन तसेच प्रमुख भूमिका ऋषभ शेट्टी यांनी साकारली आहे. या चित्रपटात दैवी परंपरा, कुटुंबातील जुने संघर्ष आणि सांस्कृतिक मुळांचा उगम दाखवण्यात आला आहे. चित्रपटात जयाराम, रुक्मिणी वसंथ आणि गुलशन देवैया यांच्या भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्या. या चित्रपटाने 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये अव्वल स्थान मिळवत जगभरात 851.93 कोटी रुपयांची कमाई केली.

दरम्यान रणवीर सिंह त्यांच्या नवीन अॅक्शनपट ‘धुरंधर’मुळेही चर्चेत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News