श्रीपाद वल्लभ हे कलियुगातील दत्तात्रेयांचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात आणि दत्त जयंती हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दत्तात्रेयांचे स्मरण आणि नामस्मरण करणे महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यांच्या नामस्मरणाने सर्व देवतांचे स्मरण केल्याचे पुण्य मिळते.
श्री दत्त जयंतीचे महत्त्व
हिंदू धर्मात दत्तजयंतीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी दत्तात्रेयांची पूजा आणि उपासना केल्याने ज्ञान, शांती आणि समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. दत्तजयंतीपूर्वी ९ दिवस ‘दत्त नवरात्र’ साजरी करतात आणि पौर्णिमेला दत्तजयंतीचा उत्सव असतो. या दिवशी भक्त दत्त पादुकांची किंवा मूर्तीची पूजा करतात आणि काही ठिकाणी दत्त परिक्रमादेखील करतात. भक्त ‘गुरुचरित्र’ ग्रंथाचे पठण करतात आणि भजन-कीर्तनाद्वारे दत्त महाराजांची भक्ती करतात. या दिवशी दत्त व्रत आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.

दत्तजयंती का साजरी केली जाते?
दत्तजयंती हा भगवान दत्तात्रेय यांच्या जन्माचा दिवस आहे, म्हणूनच तो साजरा केला जातो. दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानले जातात. या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून सायंकाळी पूजा केली जाते. दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते आणि या निमित्ताने दत्तयाग, गुरुचरित्राचे पारायण आणि दत्तात्रेय महाराजांची मूर्ती किंवा पादुकांची पूजा केली जाते आणि सायंकाळी पाळणा हलवला जातो.
दत्तजयंती कशी साजरी करतात
- भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये स्नान करतात.
- या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि फुले, धूप, दिवे आणि कापूर वापरून दत्तात्रेयांची पूजा करतात.
- दत्तजयंतीच्या दिवशी भक्त श्रीदत्त अथर्वशीर्ष आणि इतर स्तोत्रे, आरत्यांचे पठण करतात. अनेक भक्त ‘गुरुचरित्राचे’ पारायणही करतात.
- काही ठिकाणी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो आणि संध्याकाळी जन्माची कीर्तने केली जातात.
- काही भक्त दत्तजयंतीपूर्वी दत्त परिक्रमा पूर्ण करतात.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











