प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर अंदाधुंद गोळीबार; गोळीबार करून अज्ञात लोक फरार!

तीन अज्ञात लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी दोन डझनांहून अधिक राऊंड फायरिंग केली. या घरात एल्विश यादव आपल्या परिवारासह राहतो. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मात्र एल्विश घरी नव्हता.

प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार, गुरुग्राम येथील एल्विशच्या घरावर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञातांनी जोरदार गोळीबार केला. तीन अज्ञात लोक दुचाकीवरून आले आणि त्यांनी दोन डझनांहून अधिक राऊंड फायरिंग केली. या घरात एल्विश यादव आपल्या परिवारासह राहतो. ज्यावेळी गोळीबार झाला तेव्हा मात्र एल्विश घरी नव्हता. या घटनेमध्ये कोणाला इजा पोहोचली नसून या प्रकरणात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

एल्विश परदेशात; घरातील लोक सुरक्षित

एल्विशच्या घरात पहाटे गोळीबार झाला तेव्हा फक्त त्याची आई आणि केयरटेकर होता. एल्विश सध्या परदेशात आहे. या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.  दरम्यान, या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. एल्विशचे कुटुंबीय पुरते हादरून गेले आहेत. घटनेबाबत समोर येणाऱ्या माहितीनुसार हल्लेखोरांनी 25 ते 30 राउंड गोळ्या चालवल्या असा दावा एल्विशच्या वडिलांनी केला. पोलिसांनी मात्र 10 ते 12 राउंड गोळीबार झाल्याचे सांगितले. गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. तीन लोक दुचाकीवरून आले. यातील दोघांनी गोळीबार केला. फायरिंग घराच्या ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरवर झाली. एल्विश स्वतः तिसऱ्या मजल्यावर राहतो. गोळीबार झाला तेव्हा घरातील सदस्य आणि केयरटेकर घरात होते.

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

गुरुग्रामचे पोलीस पीआरओ संदीपकुमार यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की एल्विश यादवच्या घराबाहेर तीन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गोळीबार केला आहे. ही घटना साधारण पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक डझनाहून अधिक राउंड फायरिंग झाली. या गोळीबारात कुणी जखमी झाले नसले तरी घराच्या आत  भिंती आणि खिडक्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे.

हल्लेखोर नेमके कुठून आले होते. गोळीबार करून कुठे पसार झाले याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या लोकांनी काही धमकी दिली का याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे अचानक ही घटना कशी घडली असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, एल्विशच्या कुटुंबियांनी आतापर्यंत कोणतीही तक्रार पोलिसांत दिलेली नाही. या घटनेमुळे एल्विश यादवला कोणाची धमकी होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News