‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 89 वर्षांच्या धर्मेंद्र यांना 10 नोव्हेंबर रोजी वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येतीबाबत विविध अफवा पसरत असतानाच, आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. या सुधारानंतर धर्मेंद्र यांच्या घरी आज संध्याकाळी उशिरा डॉक्टरांची टीम पोहचली.
काय म्हणाले डॉक्टर?
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, धर्मेंद्र यांना कुटुंबाच्या विनंतीनुसार डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे, त्यामुळे त्यांचा पुढील उपचार आणि काळजी त्यांच्या घरातच घेतली जाणार आहे. रुग्णालयातून घरी नेताना धर्मेंद्र यांना अँब्युलन्सद्वारे सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलं. सोशल मीडियावर त्यांच्या घरी परतण्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, चाहत्यांनी या व्हिडिओवरून दिलासा व्यक्त केला आहे. यानंतर आज संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास धर्मेंद्र यांच्या घरातून डॉक्टरांची एक टीम बाहेर पडताना दिसली. ते नियमित तपासणीसाठी तिथे गेले होते.

चाहते आनंदी
धर्मेंद्र यांच्या तब्येतीत सुधार झाल्याचं वृत्त आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. सोशल मीडियावर “गेट वेल सून ही-मॅन” आणि “लव्ह यू धरम पाजी” अशा हॅशटॅगसह अनेक शुभेच्छा संदेश झळकू लागले. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
धर्मेंद्र यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी तसेच मुलगी ईशा देओल यांनीही त्यांच्या आरोग्याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. 11 नोव्हेंबर रोजी ईशा देओलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं की, “मीडियामध्ये काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पण माझ्या पप्पांची तब्येत आता स्थिर आहे आणि ते आधीपेक्षा चांगले आहेत. कृपया आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि काळजीबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत.”
धर्मेंद्र यांची तब्येत 1 नोव्हेंबर रोजी अचानक बिघडली होती. त्या दिवशी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरू लागल्या. काही वृत्तसंस्थांनी तर चुकीने त्यांच्या निधनाची बातमीही प्रसारित केली होती. परंतु हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी तत्काळ सोशल मीडियावर पोस्ट करून या अफवांना खोडून काढलं आणि स्पष्ट केलं की धर्मेंद्र उपचार घेत आहेत आणि आता हळूहळू बरे होत आहेत.
त्यांच्या रुग्णालयात असतानाच शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. धर्मेंद्र यांच्या आरोग्यविषयी सर्व कलाकार आणि चाहत्यांमध्ये प्रचंड काळजी होती.
सध्या धर्मेंद्र त्यांच्या घरावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचारामुळे ते लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावरून सतत त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील एक दिग्गज आणि आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जातात. ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’, ‘धर्मवीर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाची अमिट छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधार झाल्याची बातमी चाहत्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे.
मनोरंजन विश्वातील सर्वांच्या शुभेच्छांमध्ये आता एकच भावना व्यक्त होत आहे “आपला ही-मॅन पुन्हा लवकरच पडद्यावर पाहायला मिळो.”











