Dhurandhar Movie : रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला स्पाय-थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ सध्या केवळ बॉक्स ऑफिसवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करत दमदार यश मिळवलं आहे. 19 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘अवतार: फायर अँड अॅश’पर्यंत ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोणतीही मोठी स्पर्धा नसल्याचं चित्र आहे.
मोदींचे नाव कोणी घेतले
मात्र भारतात यशस्वी ठरलेला ‘धुरंधर’ पाकिस्तानमध्ये मात्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटावर तिथल्या माध्यमांकडून टीका सुरू झाली, पण काही पत्रकारांनी या टीकेला वादग्रस्त वळण दिलं आहे. पाकिस्तानमधील पत्रकार नईम हनीफ यांनी एका टीव्ही चॅट शोमध्ये बोलताना धक्कादायक दावा केला की, ‘धुरंधर’ या चित्रपटाची पटकथा थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे. या चर्चेत पाकिस्तानमधील प्रसिद्ध अँकर मुबाशिर लुकमानही सहभागी होते. त्यांनी दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटावर टीका करत, भारत कथितपणे ‘प्रोपगंडा’ चित्रपट बनवत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी आर्थिक मदत का करू नये, असा सवाल उपस्थित केला.
म्हणे मोदींनी स्क्रिप्ट लिहिली (Dhurandhar Movie)
नईम हनीफ यांनी शोदरम्यान स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “माझ्याकडे माहिती आहे. आपण ज्या ‘धुरंधर’ चित्रपटावर चर्चा करतोय, त्याची स्क्रिप्ट नरेंद्र मोदी यांनी स्वतः पाहून मंजूर केली आहे.” हा दावा ऐकून स्टुडिओतही क्षणभर शांतता पसरली. या विधानाचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर काही तासांतच प्रचंड वेगाने व्हायरल झाला.
या दाव्यानंतर भारतीय सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक युजर्सनी पाकिस्तानी पत्रकारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. एका युजरने लिहिलं की, एक चित्रपट जर एकाच वेळी पाकिस्तान आणि डाव्या विचारसरणीला अस्वस्थ करत असेल, तर तेच त्याचं खरं यश आहे. दुसऱ्या युजरने उपरोधिकपणे म्हटलं की, मोदीजी आधी रणवीर सिंगची भूमिका साकारणार होते, अशी अफवाही आता पसरवली जाईल. काही युजर्सनी मात्र या प्रकाराला गंभीर मानसिकतेचं उदाहरण म्हणत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, वादविवादांपासून दूर ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवून आहे. अवघ्या सात दिवसांत चित्रपटाने जगभरात सुमारे 313 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 400 कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज ट्रेड विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. रणवीर सिंगच्या करिअरमधील हा आणखी एक मोठा ब्लॉकबस्टर ठरत असून, चित्रपटाभोवतीचा वाद त्याच्या लोकप्रियतेत अधिकच भर घालत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.





