252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात ओरहान अवात्रमणी उर्फ ऑरी अडचणीत सापडला आहे. सोशल मीडियावर स्टार्ससोबतचे फोटो, व्हिडिओ आणि ग्लॅमरस पोस्ट्समुळे चर्चेत असलेला ऑरी या वेळी एका गंभीर गुन्ह्याच्या तपासामुळे बातम्यांमध्ये आला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स सेलने त्याला चौकशीसाठी समन्स पाठवले असून आज तो तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होणार आहे. या प्रकरणाचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडलेल्या एका ड्रग्ज नेटवर्कशी असल्याचा प्राथमिक संशय आहे.
कुठून सुरू झाला तपास
या तपासाची सुरुवात मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेखच्या अटकेनंतर झाली. शेखला दुबईहून डिपोर्ट केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मुंबईतील हाय-प्रोफाइल रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्याचा आरोप आहे. या पार्ट्यांमध्ये अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित असत, असा तपासात दावा करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान शेखने काही नामांकित व्यक्तींची नावं घेतली, ज्यामध्ये नोरा फतेही, श्रद्धा कपूर, सिद्धांत कपूर, फिल्ममेकर अब्बास–मस्तान, ऑरी आणि राजकीय नेते ज़ीशान सिद्दीकी यांचा समावेश असल्याचे समोर आले. या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी ANC ने ऑरीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ऑरीच्या जबाबावर तपासाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्याच्या उत्तरांनुसार इतर सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

नोराने फेटाळले आरोप
दरम्यान, डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीने स्वतःवर झालेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये तिने स्पष्ट केले की ती पार्ट्यांना जात नाही, ती सतत प्रवासात आणि कामात व्यस्त असते. तिचा कोणत्याही चुकीच्या व्यक्तींशी संबंध नाही आणि तिचे नाव अनावधानाने टारगेट केले जात असल्याचे तिने म्हटले. तिला बदनाम करण्याचे प्रयत्न यापूर्वीही झाले असून, यावेळी ती ते सहन करणार नसल्याचे नोराने ठामपणे सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, ऑरी आज घाटकोपर येथील ANC कार्यालयात हजर होऊन आपला विस्तृत जबाब नोंदवणार आहे. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई ठरवली जाईल. इतर कोणाला समन्स पाठवायचे की नाही, हेही ऑरीच्या चौकशीतील माहितीवर अवलंबून असेल. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे आणि तपासात अजून कोणती नावं समोर येतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.











