मोठी बातमी! राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर 18,106 शिक्षकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार

Rohit Shinde

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही जर शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित एखादी नोकरी शोधत असाल अथवा त्याच्याशी निगडीत तुमचा अनुभव अथवा शैक्षणिक पात्रता असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, राज्यात कंत्राटी पद्धतीने 18106 पदांसाठी शिक्षक भरती केली जाणार आहे. राज्यात एकूण 18,106 कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार असून ही पदे 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील माहिती काळजीपूर्वक जाणून घ्या…

कंत्राटी पद्धतीने 18,106 पदांसाठी भरती

राज्यात कंत्राटी पद्धतीने 18106 पदांसाठी शिक्षक भरती केली जाणार आहे. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. संचमान्यतेचा 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यानंतर आता 10 पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत 1 शिक्षक आणि 20 पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत 1 नियमित आणि 1 कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे.

कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळांमधील अध्यापनाची गुणवत्ता अबाधित ठेवण्यासाठी सरकारने कंत्राटी शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. राज्यात एकूण 18,106 कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येणार असून ही पदे 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरण्यात येणार आहेत.

अनेक गरजू आणि इच्छुकांना संधी

राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षा कमी असल्याने या भरतीची आवश्यकता निर्माण झाली आहे. याशिवाय माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गांत विद्यार्थीसंख्या 20 पेक्षा कमी असल्यास शिक्षक अतिरिक्त होतील आणि त्यांचे समायोजन करावे लागणार आहे. या समायोजनासाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून सुमारे 640 शाळांमधील 3,000 शिक्षकांवर या प्रक्रियेचा थेट परिणाम होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ताब्यातील एकूण 64,000 शाळांपैकी 8,089 शाळांमध्ये पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे, तर 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या 18,106 आहे. त्यामुळे या सर्व शाळांसाठी कंत्राटी शिक्षक भरतीची ही मोठी मोहीम राबवली जाणार आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षणातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठीही कंत्राटी भरती केली जाऊ शकते अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. खाजगी अनुदानित शाळांमध्ये नववी-दहावीच्या वर्गांत विद्यार्थीसंख्या कमी असल्यास तेथील शिक्षकांचे समायोजन होणार असले तरी पाचवी ते आठवीच्या शिक्षकांबाबत अद्याप ठोस धोरण जाहीर झालेले नाही. याबाबत अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही संबंधित विभागाचे संकेतस्थळ तपासू शकता.

ताज्या बातम्या