महाराष्ट्रातील पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही. मान्सूनचा प्रभाव संपला असला तरी अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी बरसत आहे. दक्षिण भारतातील राज्यांतील पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात देखील जाणवत आहे. राज्यातील पावसाबाबत आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली आहे.
पुढील 48 तासात मुसळधार बरसणार!
राज्यभरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकण, मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा ते विदर्भ सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढली आहे. काढणीला आलेली पिकं पाण्यात भिजत असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान होत आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज मुंबई पुण्यासह बहुतांश महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट आहे.
आता पुढील दोन दिवस पुण्यासह राज्यातील इतर भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 48 तासांसाठी मुंबईसह उपनगरांना वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मोंथा चक्रीवादळाचा पूर्व किनारपट्टीवरील प्रभाव आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पावसाची स्थिती आणखी तीन दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
राज्यातील अनेक भागांत आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही भागांत आज पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रायगड, मध्य मध्य महाराष्ट्र, सोलापूर, पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेड या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे पावसाचा धोका!
महाराष्ट्रात दोन दिवस अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील ‘चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याच्या चारही विभागांत पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेली प्रणाली 25 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यात आणि 27 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. 26 ऑक्टोबरपासून मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
या निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यांसह महाराष्ट्रावर देखील होणार आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांचे दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह जोरदार सरी अपेक्षित आहेत. मुंबई, गोवा आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांतही ढगाळ वातावरण राहून, विजांच्या कडकडाटासह मान्सूननंतरचा पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे रब्बी हंगांमाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.





