विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडण घडणीत दहावीच्या निकालाला विशेष महत्व असते. उद्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होईल, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, आर्ट्स , सायन्स की कॉमर्स निवडावं? असा सवाल विद्यार्थ्यांसमोर उभा राहत असतो. त्याचबरोबर दहावी शिक्षणावर करीअरचे इतर काही पर्याय आहेत, असा सवाल देखील उपस्थित होतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…
कोणती शाखा निवडावी?
१० वी नंतर कोणती शाखा निवडावी, हे तुमच्या आवडी, क्षमते, आणि भविष्यातील करिअरच्या उद्दिष्टांवर अवलंबून असते. तुमची ध्येय निश्चित करणे शाखा निवडताना अत्यंत जरूरी असते. स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील करिअरचे स्वप्न विचारात घेऊन शाखा निवडा. चुकीच्या माहितीवर किंवा फक्त इतरांनाच पाहून निर्णय घेणे टाळा.

विज्ञान शाखा
जर तुम्हाला डॉक्टरी, इंजिनीअरिंग, फार्मसी, आयटी, रिसर्च, किंवा डिफेन्स क्षेत्रात जायचे असेल तर विज्ञान शाखा योग्य आहे. ही शाखा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यासारख्या विषयांवर आधारित असते. विज्ञान शाखेचे विद्यार्थी मेडिकल (NEET), इंजिनीअरिंग (JEE), NDA, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरतात.
वाणिज्य शाखा
जर तुम्हाला बिझनेस, अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटंट (CA), कंपनी सेक्रेटरी (CS), किंवा मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे असेल, तर Commerce हा योग्य पर्याय आहे. या शाखेत अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडीज, मॅथ्स (पर्यायी) असे विषय असतात.
कला शाखा
जर तुम्हाला समाजशास्त्र, मानसशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास, पॉलिटिकल सायन्स किंवा पत्रकारिता, सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC), किंवा शिक्षण क्षेत्रात जायचे असेल, तर कला शाखा निवडा. कला शाखा विचारसरणी, विश्लेषण आणि लेखन कौशल्य वाढवते.
करीअरचे इतर पर्याय काय?
कला, वाणिज्य अथवा सायन्स शाखेतून शिक्षण घेऊन तुम्ही करीअर करू शकता, याशिवाय, ITI (Industrial Training Institute), पॉलिटेक्निक डिप्लोमा, डिजाइनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, अॅनिमेशन, डिजिटल मार्केटिंग किंवा अॅप डेवलपमेंट सारख्या कोर्सेसही करता येतात. हे कोर्सेस थेट नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला लवकर नोकरी करायची असेल, तर व्यावसायिक कोर्सेस चांगला पर्याय ठरतो. योग्य मार्गदर्शन घेऊन आणि स्वतःच्या आवडीनुसार निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.











