‘फक्त 1500 नव्हे, आता 1 कोटी महिलांना लखपती बनवणार’, फडणवीसांचं विधान…नेमकी योजना काय?

Rohit Shinde

वर्धा: राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणावर राज्यात सातत्याने वेगवेगळी विधान आणि घोषणा केल्या जात आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज देऊ, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वर्ध्यात मोठं विधान केलं आहे. फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. आगामी काळात लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम बनवायचं आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

‘1 कोटी महिलांना लखपती करणार…’

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही. तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे. त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. आमचं लक्ष्य आहे की, राज्यातील 1 कोटी बहिणींना लखपती बनवणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरु आहे”.  आता आगामी काळात याबाबत पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. ही योजना केंद्र सरकारची लखपती दीदी योजना असण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नेहमी चर्चेत असते. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आगामी काळात या योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका  योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आगामी काळात लाडक्या बहिणींना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

लखपती दीदी योजना नेमकी काय?

केंद्र सरकारची लखपती दीदी योजना ही ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना स्वयं-रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना ‘लखपती’ बनवणे हा आहे.

राज्यातील लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींना कर्ज देण्याबाबत विचार सुरु असल्याचे म्हटले होते. “राज्य सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. राज्यातील 2 कोटींहून अधिक बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होत आहेत. दरमहा 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. त्याऐवजी लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य द्यायचे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळता करता येईल. सरकार बँकांसोबत चर्चा करुणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल म्हणून 30 ते 40 हजार रुपये उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे’ असं अजित पवारांनी म्हटलं होतं. आता या योजनेची अंमलबजाणी होणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या