राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी घाटमाथा आणि सह्याद्री डोंगररांगेत पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात अद्यापही पुरसदृश्य परिस्थिती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे. पावसाचे प्रमाण अचानक वाढले तर पुराचा धोका संभवतो. जिल्ह्यातील विविध नद्यांच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे एकूण 79 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. आज दिवसभरात परिस्थिती काहीशी पुर्वपदावर येताना दिसत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदीने जवळपास धोका पातळी गाठली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 8 इंच इतकी असून, आणखी काही इंच वाढ झाल्यास ती धोका पातळी ओलांडेल. नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याने कोल्हापूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आंबेवाडी आणि चिखली गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याच्या काही भागात पावसाचा धोका कायम
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते, पण आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
कोकणासह घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईत सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी, आज जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्येही पावसाची हीच स्थिती कायम राहील असा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबई आणि कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला असला तरी, पुणे घाटमाथ्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. या भागात आजही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





