फास्टॅग हा रस्त्यावर टोल वसुलीची प्रक्रिया जलद आणि सोयीस्कर बनवण्यासाठी वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक प्रणाली आहे. वाहनाच्या विंडशील्डवर लावलेल्या आरएफआयडी टॅगद्वारे टोल प्लाझावर स्वयंचलितपणे शुल्क आकारले जाते. यामुळे रोख रक्कम देण्याची गरज नसते आणि वाहनांची लांब रांग टाळता येते. फास्टॅगमुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि वाहतुकीचा वेग वाढतो. तसेच पर्यावरणपूरक प्रवासाला प्रोत्साहन मिळते कारण वाहतूक कोंडी कमी होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅगचा वापर बंधनकारक केला आहे, ज्यामुळे टोल व्यवस्थापन पारदर्शक व कार्यक्षम झाले आहे. हा प्रणाली प्रवाशांना अखंडित प्रवासाचा अनुभव देतो आणि देशाच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो.
FASTag वार्षिक पासची सुविधा उपलब्ध!
राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून FASTag वापरकर्त्यांसाठी वार्षिक पासची सुविधा सुरू होणार असून, यामुळे टोल प्लाझांवर वारंवार थांबण्याची गरज राहणार नाही. या योजनेत केवळ 3000 रुपयांत एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्यांसाठी टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. वेळ आणि पैशाची बचत करणारा हा पास दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ही सुविधा केवळ खाजगी कार, जीप आणि व्हॅनधारकांना लागू असेल, तर व्यावसायिक वाहनांना याचा लाभ मिळणार नाही. चुकीची माहिती दिल्यास किंवा गैरवापर झाल्यास पास त्वरित रद्द केला जाणार आहे.
पासची वैधता आणि कुठे वापरायचा?
संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (NE) नेटवर्कवर हा वार्षिक पास वापरता येणार आहे. त्यामुळे शहरांतर्गत आणि लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग टोल प्लाझांवर होणारा त्रास टळेल. पास मिळवण्यासाठी वाहनधारकांनी हायवे यात्रा मोबाईल अॅप किंवा NHAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीदरम्यान 3000 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर फक्त दोन तासांत हा पास सक्रिय होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे महामार्ग प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल, तसेच इंधन आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होईल. त्यामुळे यानिमित्ताने या निर्णयामुळे वाहनचालकांना मात्र मोठा दिलासा मिळत आहे. या निर्णयाचे स्वागत देखील वाहनचालक तसेच मालकांकडून केले जात आहे.





