मी खरी खिचडी खायला आलो होतो, उबाठा गटाने आत्मपरीक्षण करावे, राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?

Astha Sutar

Uday Samant – अजित पवार आणि शरद पवार तसेच दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत असताना, आज (मंगळवारी) मंत्री उदय सामंत यांनी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मी या परिसरातून जात होतो. म्हणून मी राज ठाकरेंची भेट घेतली.

आता मी इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी जाणार आहे. मग मी राज ठाकरेंचा निरोप घेऊन तिकडे गेलो, असा तुम्ही अर्थ काढणार का? शिवाजी पार्क हे मुंबईत आहे, आणि मुंबई महाराष्ट्रात येते. मी राज्याचा मंत्री आहे. कुठेही जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या भेटीनंतर मंत्री सामंत यांनी दिली.

राजकीय खिचडी नाही तर खरी खिचडी खाल्ली…

दरम्यान, मी आज राज ठाकरेंकडे नाष्टा करण्यास आणि चहा पिण्यास आलो होतो. मात्र कोणतीही राजकीय चर्चा नाही. राजकीय खिचडी नाही तर खरी खिचडी खाण्यास आलो होतो. पालिका निवडणुकीबाबत भेट होती का, यावर बोलताना सामंत म्हणाले की, जर पालिका निवडणुकीबाबत भेट असती तर आम्ही एकत्ररित्या पत्रकार परिषद घेतली असती. तुम्हा सर्वांना माहिती दिली असती.

मी या परिसरातून जात होतो. राज ठाकरेंना मी फोन केला. येऊ का असे विचारले ते बोलले या. म्हणून मात्र आजच्या भेटीत कोणतीही पालिका निवडणुकीबाबत किंवा कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नसल्याचे भेटीनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

म्हणून ते डिप्रेशनमध्ये असतील…

दुसरीकडे उबाठा गटातील काही माजी आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामा देताहेत, त्यांना सोडून जाताहेत. यावर उबाठा गटाने आणि त्यांच्या पक्षप्रमुखानी आत्मपरीक्षण करावे, असं सामंत म्हणाले. सर्वांना आता राज ठाकरेंची गरज पडायला लागली, असं विजय वडेट्टीवारांनी टिका केली आहे. यावर बोलताना सामंत म्हणाले की, वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांना कदाचित प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्यामुळं ते डिप्रेशनमध्ये असतील. संपलेल्या लोकांनी दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा स्वत:कडे लक्ष द्यावे. असा टोला उदय सामंतांनी विजय वडेट्टीवार यांना लगावला.

ताज्या बातम्या