ठाकरे बंधूंच्या मनोमीलनासोबतच पवार काका-पुतण्याही एकत्र येण्याची चर्चा, ‘पांडुरंगांची इच्छा’,काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Smita Gangurde

मुंबई – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमीलनाच्या चर्चा राज्यात सुरु असतानाच, शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांनीही एकत्र यावं असं आवाहन आता करण्यात येतंय. पवार घराण्यातील आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच कुटुंबीयांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केलीय.

अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील दुरावा कमी झाल्याची चर्चा आहे. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीलाही दोन्ही काका-पुतणे हे एकमेकांशएजारी बसलेले पाहायला मिळाले होते. शरद पवार हेच आपलं दैवत असल्याचंही अजित पवारांनी गेल्या काही काळात पुन्हा एकदा ठासून सांगितलंय. या सगळ्यामुळेही पवार काका-पुतण्यातील वाद कमी होत असल्याची चर्चा आहे.

रोहित पवारांची काय एक्स पोस्ट?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर सगळ्याच राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात. ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलेच आहे, असा सूर सगळ्याच राजकीय पक्षांचा होता. त्यातच आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत सर्वच कटुंबांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्याची पोस्ट केली. यात त्यांनी उद्धव, राज ठाकरे आणि शरद पवार आणि अजित पवारांनाही टॅग केलंय. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर #सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे.’

पांडुरंगाची इच्छा- सुप्रिया सुळे

पवार काका-पुतण्यांनी एकत्र येण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता, त्यांनी यावर केवळ पांडुरंगाची इच्छा अशी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवारांच्या मातोश्री आशाताी पवार यांनी १ जानेवारीला नववर्षाच्या दिवशी पंढरपुरात पवार कुटुंब एकत्र येऊ दे, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली होती. त्यापूर्वी १२ डिसेंबंरला अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांतील दुरावाही कमी होताना दिसतोय. आता ठाकरे बंधूंप्रमाणेच पवार काका-पुतणेही एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

ताज्या बातम्या