पुणे शहरातील गणेशोत्सव राज्यासह परदेशातही प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे गणपती व देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे. त्याबाबत सध्या चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील गर्दी नियंत्रणासाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे.
दर 3 मिनिटांनी मेट्रो चालविण्याची शक्यता
कसबा पेठ, मंडई मेट्रो स्थानक येथील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर मेट्रो दर तीन मिनिटांनी चालविण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून चाचण्या घेतल्या जात आहेत, अशी माहिती महामेट्रो, व्यवस्थापकीय संचालक, श्रावण हर्डीकर यांनी दिली. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कसबा पेठ मेट्रो स्थानक येथे उतरावे. तेथून गणपती पाहण्यास जावे. परतीचा प्रवास मंडई मेट्रो स्थानकापासून करावा. त्यामुळे एकाच मेट्रो स्टेशन्सवर गर्दी होणार नाही; तसेच वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्यांनी पुणे महापालिका मेट्रो स्थानक येथे उतरून देखावे पाहण्यासाठी जावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
गर्दी नियंत्रणासाठी मेट्रोची उपाययोजना
शहराच्या मध्य भागात गणपती पाहण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने गणेशोत्सवातील गर्दीच्या वेळी स्वारगेट ते जिल्हा न्यायालय दरम्यान दर तीन मिनिटांनी मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्या दृष्टीने चाचणी घेतली जात आहे. यामुळे मंडई, कसबा पेठ येथील गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदाच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सुरू असणार आहे. या मार्गावरील कसबा, मंडई, स्वारगेट ही मेट्रो स्थानके सुरू झाली आहेत. ही स्थानके नागरिकांना थेट मानाच्या गणपती मंडळांजवळ नेतात. त्यामुळे प्रवाशांना गर्दी टाळून मेट्रोने गणेशोत्सव पाहण्यासाठी जाता येणार आहे. नागरिक रात्री १२ पर्यंत देखावे, गणपती पाहण्यासाठी येतात. त्यामुळे महामेट्रोने पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.





