गेल्या महिनाभरापासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे शेती क्षेत्राचं मोठं नुकसान देखील झालं होतं. बळीराजा अडचणीत असतानाच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अलर्ट दिला आहे. राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचे संकट आहे. आज राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. आजही राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. विदर्भ, मराठवाड्यासह आज मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आज हवामान विभागाने 20 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 20 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यावर कमी दाबाचा पट्टा
राज्यावर सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून कोकण, उत्तर महाराष्ट्र ते मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मराठवाडा, उत्तर कर्नाटक, तमिळनाडूत पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रासह , अवघ्या दक्षिण भारताला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.
राज्यातील उष्णता कायम
राज्यात पावसाची शक्यता असली तरी काही भागात सूर्य आग ओकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथे राज्यातील सर्वाधिक 40.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथे 40 अंशांपेक्षा जास्त आणि वर्धा, अकोला, यवतमाळ, भंडाऱ्यात 39 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना योग्य ती खबरदारी घण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाच्या दक्षिणेकडील भागात आज उष्णतेची शक्यता आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आठवड्याच्या शेवटी या भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे, यामुळे तापमान कमी होईल आणि लोकांना उष्णतेपासून आराम मिळेल अशी आशा आहे.