दिवाळीच्या सणात फटाके फोडण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असली तरी त्यातून होणारे वायु प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. फटाक्यांमधून निर्माण होणारा धूर आणि हानिकारक रासायनिक वायू वातावरणात मिसळून हवेत प्रदूषकांचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि ऍलर्जीच्या समस्या वाढतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा असलेले रुग्ण यांना त्रास होतो. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणपूरक फटाके वापरणे किंवा फटाके न फोडता सण साजरा करणे हीच योग्य दिशा आहे. अशा परिस्थितीत फटाके फोडण्यावर पूर्ण निर्बंध न आणता पुणे पोलिसांनी काही नियमावली जाहीर केली आहे.
पुणे पोलिसांची नियमावली जाहीर
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. हे वायू प्रदूषण टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. फटाके वाजवण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आधीच नियमावली निश्चित केली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई
पुणे शहरात 20 ते 24 ऑक्टोबर दरम्यान तात्पुरत्या परवानगीवर फटाक्यांची विक्री करता येणार आहे. पण महामार्गावर, पुलावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणे आणि अग्निबाण उडवणे पूर्णपणे बंद आहे. फटाक्यांचा आवाज 125 डेसिबलपेक्षा जास्त नसावा, असा नियम करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे फटाके वाजविणारे आणि विक्री करणारे दोन्हींवर निर्बंध आले आहेत.











