राज्यात आज पुन्हा पाऊस बरसणार, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने आता जवळपास 25 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. नेमका हवामान विभागाचा अंदाज काय? सविस्तर जाणून घेऊ...

राज्यात सातत्याने पावसाच्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी गारपीट आणि अतिमुसळधार पाऊस देखील होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आज म्हणजेच 17 मे रोजीही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने 25 जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे. राज्यातील एकूणच पावसाची स्थिती कशी राहिल? त्याबाबत हवामान विभागाने काय अंदाज वर्तवला आहे, ते जाणून घेऊ….

मराठवाडा, कोकणाला अलर्ट कायम

मे महिन्यात राज्यातल्या अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात 17 मे रोजीही पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण कायम आहे. हवामान विभागाने काही भागात अलर्ट जारी केला आहे. ठाणे, मुंबई, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, नंदुरबार, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, धाराशिव, अकोला, बीड, नांदेड, लातूर, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, भंडारा, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भाला पाऊस झोडपणार?

तिकडे विदर्भाला देखील पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये प्रचंड विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात शेतीची बऱ्यापैकी कामे आटोपली असल्याने या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच तापमानाचा पारा या भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता, त्या उकाड्यातून दिलासा मिळणार आहे. तसेच यंदा शेतीच्या कामांना लवकर वेग येई.
मुंबईत 17 मे रोजी किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत आकाश ढगाळ राहील. मुंबईत दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुण्यात 17 मे रोजी किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. तर पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील. पण दुपारनंतर पाऊस पडेल. दिवसा जास्त वेगाने वारे वाहतील. एकंदरीत अवघं राज्य पावसाने व्यापलं आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News