पुढील आठवड्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईतील तब्बल 11 विभागांमधील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. काही ठिकाणी पाणीकपात होणार आहे तर काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची डोकेदुखी आता चांगलीच वाढणार आहे. एकूणच अशा पाणीकपातीमुळे किंवा पाणीपुरवठा बंद राहिल्याने मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य पूर्णपणे कोलमडत असते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे.
मुंबईकरांची डोकेदुखी वाढणार; सोमवारपासून कुठे कमी दाबाने तर कुठे पाणीपुरवठा पूर्ण बंद…जाणून घ्या!
मुंबई (3) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (1 आणि 2) शाफ्टला जोडणाऱ्या 2500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी छेद-जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने सोमवार, 1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते मंगळवार, 2 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 11 प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
