MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

बंगळुरूमध्ये RCB च्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी, चिन्नास्वामी स्टेडियमजवळ 7 क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू

Written by:Smita Gangurde
आयपीएल २०२५ मधील ऐतिहासिक विजयानंतर कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सत्कार समारंभ आयोजित केला होता, ज्यामध्ये हजारो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चाहते आले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेडदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ अचानक चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्याशिवाय ५० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा अपघात घडला.

अचानक गर्दी वाढली…

मिळालेल्या माहितीनुसार, हजारो चाहते या स्टेडियमजवळ जमा झाले होते. अचानक गर्दी वाढल्याने जमावावर नियंत्रण करणं अवघड झालं आणि चेंगराचेंगरी झाली. येथील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

लोकांनी एकमेकांना केली मदत…

चेंगराचेंगरीमुळे स्टेडियमच्या बाहेर आरसीबीचे अनेक चाहते बेशुद्ध झाले. सर्व जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी एकमेकांना मदत केली. काही जखमींना सीपीआरही दिला जात असल्याचं पाहायला मिळालं.


आरसीबीच्या विजयाच्या परेडमध्ये शोक पसरला…
आरसीबीची टीम विजय साजरा करीत होती. यारम्यान हजारोंच्या संख्येमध्ये चाहते तेथे उपस्थित होते. ते आयपीएल २०२५ च्या विजयी टीमला सपोर्ट करण्यासाठी , टीमचं कौतुक करण्यासाठी आणि आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तिथं आले होते. त्यादरम्यान अचानक गर्दी वाढली आणि नियंत्रणाबाहेर गेली.