MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Viral Video : आधी चपलेने मारलं नंतर हात जोडले, बंगळुरूतील रिक्षा चालकाला मारणाऱ्या महिलेला घडली अद्दल

Written by:Smita Gangurde
या प्रकरणात रविवारी या महिलेला ऑटो रिक्षाचालकावर चप्पलने हल्ला केल्याबद्दल अटक करण्यात आली. यानंतर महिलेने रिक्षा चालकाची माफी मागितली.

अनेकदा सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हसवतात तर काही व्हिडिओ पाहून तुमचा पारा चढतो. काही दिवसांपूर्वी बंगळुरूतून असाच एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात एक महिलेने रिक्षा चालकाला चप्पलने मारहाण केली होती.

या प्रकरणात रविवारी या महिलेला ऑटो रिक्षाचालकावर चप्पलने हल्ला केल्याबद्दल अटक करण्यात आली. पंखुडी मिश्रा असं या महिलेचं नाव आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ऑटो चालक लोकेशला चप्पलने मारताना दिसत आहे. शनिवारी पंखुडी आपल्या पतीसह दुचाकीवर जात असताना हा प्रकार घडला.

भांडणाचं कारण काय?

ऑटो रिक्षा चालक लोकेशने महिलेला रिक्षाने धडक दिल्याचा आरोप पंखुडीने केला आहे. मात्र लोकेशने हा आरोप फेटाळला आहे. या वादादरम्यान लोकेशने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करीत होता. यावेळी पंखुडीने रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला केला. व्हिडिओमध्ये पंखुडी म्हणते की, व्हिडिओ करणार? व्हिडिओ शूट कर आणि यानंतर ती वारंवार त्याला चप्पलेने मारत आहे. यानंतर पंखुडी कोणाला तरी फोन करते आणि म्हणते, ऑटो रिक्षा चालक गैरवर्तणूक करीत आहे. आधी याने माझ्या पायाला रिक्षाने धडक दिली आणि आता व्हिडिओ करीत आहे. यावेळी तिचा पती शेजारी दुचाकीवर बसलाय आणि तो या घटनेचा व्हिडिओ शूट करीत आहे.


ड्रायव्हरने व्हिडिओ का केला?

लोकेशने सांगितलं की, त्याने व्हिडिओ शूट केला कारण महिला हिंदीमध्ये वाद करीत होती. बंगळुरूत सर्वसाधारणपणे स्थानिक भाषा कन्नड बोलली जाते. या घटनेनंतर पंखुडी आणि तिच्या पतीने रिक्षा चालकाची माफी मागितली.


पंखुडी म्हणाली, मी माफी मागते. मी प्रेग्नेंट आहे. माझ्या बाळाला काही होईल अशी मला भीती वाटली. पुढे पंखुडी म्हणते, मला बंगळुरू आवडतं. मला इथली संस्कृती आणि लोकही आवडतात. मारहाणीच्या घटनेनंतर पंखुडीला जामीन मिळाला आहे. सोशल मीडियावर या घटनेवरुन विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.