India Vs UAE Asia Cup Match : क्रिकेट विश्वातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आशिया चषकातील दुसरा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) क्रिकेट संघात येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं 9 विकेटनं दणदणीत विजय मिळवला आहे. अपेक्षेप्रमाणे टीम इंडियानं एकतर्फि विजय मिळवला आहे. या स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे.
यूएई संघाच्या केवळ 57 धावा
दरम्यान, प्रथम फलंदाजी करायला आलेला यूएईचा संघ भारतीय गोलंदाजी समोर संपूर्ण 20 षटकही खेळू शकला नाही. त्यांचा डाव अवघ्या 13.1 षटकात संपुष्टात आला. आणि केवळ 57 धावा यूएई संघाने केला. युएईला पहिला धक्का 26 धावांवर बसला आणि यानंतर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पुढच्या नऊ विकेट त्यांनी केवळ 27 धावांत गमावल्या. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक चार, शिवम दुबेनं तीन तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. विशेष म्हणजे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाविरुद्ध कोणत्याही संघाने केलेल्या या सर्वात कमी धावा आहेत.
27 चेंडूत खेळ खल्लास
टिम इंडियाने 57 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 3.5 षटकात 48 धावांची भागीदारी करत संघाला लवकरात लवकर विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमंगील यांनी मात्र, या दरम्यान आक्रमक फटका मारण्याच्या नादात अभिषेक शर्मा 16 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. सलामीवीर शुभमन गिल 20 तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव 7 धावांवर नाबाद राहिले. आता टीम इंडियाचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.





