मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा महालक्ष्मी व्रतासाठी महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात गुरुवारी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धन-धान्य नांदते असे म्हणतात. या व्रतासाठी कलश मांडून पूजा करतात. देवी लक्ष्मीची पूजा करून रात्री गोड-धोड नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. बऱ्याच ठिकाणी या व्रताच्या निमित्ताने स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. या व्रतामुळे ऐश्वर्य, यश आणि धन-संपत्ती प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे.
महालक्ष्मी व्रताचे महत्त्व
मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धन-धान्याची भरभराट होते. या दिवशी कलश आणि देवीची विधिवत पूजा केली जाते आणि लाह्या-फुटाणे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हे व्रत घरात सुख-समृद्धी आणि शांती आणते, असे मानले जाते. मनोभावे पूजा केल्यास देवी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावर कृपा करते.

महालक्ष्मी व्रताचा पूजाविधी
- गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून तयार व्हावे.
- सुवासिनी या दिवशी उपवास करतात. सर्वप्रथम चौरंग किंवा पाट मांडावा. त्या पाटावर स्वच्छ कापड अंथरावे. त्यानंतर एक पाण्याचा कलश घ्या. त्यात सुपारी, दूर्वा आणि नाणे टाकावे. कलशासाठी आंब्याची किंवा अशोकाची पाच ते सात पाने वापरावी.
- या पानांमध्ये नारळ ठेऊन कलश तयार करावा. त्यानंतर कलशावर हळद-कुंकु लावावे. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी.
- आता पाटावर तांदळाची रास ठेवा आणि त्यावर तयार केलेला कलश ठेवा. कलशाची पूजा करा त्याला फुले आणि अक्षता अर्पण करा.
- कलशावर ठेवलेल्या नारळाला फुले आणि अक्षता अर्पण करा. यानंतर पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा.
- देवीच्या मूर्तीला हळद-कुंकू लावा आणि फुलांनी सजवा.
- नंतर देवीसमोर गोडाचा प्रसाद, मिठाई, खीर आणि फळे अर्पणकरा.
- दिवा लावून लक्ष्मी मातेचे ध्यान करा आणि वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचा किंवा ऐका. आणि शेवटी आरती करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











