MP Breaking News
Fri, Dec 12, 2025

Kartik Purnima : कधी आहे कार्तिक पौर्णिमा? पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व काय ? जाणून घ्या…

कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने आणि पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, धन-संपत्तीची कमतरता भासत नाही.

दिवाळी नंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते. कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा असून त्यानंतर दान केले जाते. या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते आणि मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. त्यासोबतच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमा कधी असते? पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व काय ? जाणून घेऊया….

कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. असे म्हटले जाते की, यादिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे. त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिक आहे.

कार्तिक पौर्णिमा कधी?

कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात 4 नोव्हेंबर (मंगळवार) 2025 रोजी रात्री 10 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल. तर, या तिथीची समाप्ती 5 नोव्हेंबर (बुधवारी) रात्री 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. पौर्णिमा तिथीचा उदय 5 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. उदय तिथीनुसार, कार्तिक पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान 5 नोव्हेंबर 2025 रोजी केलं जाईल.

कार्तिक पौर्णिमा तिथीचा शुभ मुहूर्त

  • गंगा स्नान मुहूर्त (ब्रह्म मुहूर्त) : सकाळी 4 वाजून 52 मिनिटांपासून ते सकाळी 5 वाजून 44 मिनिटांपर्यंत असेल.
  • पूजेचा शुभ मुहूर्त : सकाळी 7 वाजून 58 मिनिटांपासून सुरु होईल ते सकाळी 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत असणार आहे.

कार्तिक पौर्णिमा पूजा विधी 

  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान,दीपदान आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे.
  • कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून गंगास्नान किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावं.
  • जर, हे करणं शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावं.
  • स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • ‘ॐ सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करुन जल अर्पण करावं.
  • भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोची पूजा करावी.
  • संध्याकाळी पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)