MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

गौराईला तीन दिवस कोणते नैवेद्य दाखवतात? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

धार्मिक मान्यतेनुसार, गौराई घरी येण्याला गौरी आवाहन म्हटले जाते. असे म्हटले जाते की, तीन दिवस देवी गौरी आपल्या माहेरी येते.
गौराईला तीन दिवस कोणते नैवेद्य दाखवतात? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Gauri Puja 2025:    महाराष्ट्रात सध्या मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात आहे. २७ ऑगस्टला बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी अगदी थाटामाटात बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनानंतर देवी गौराई घरी येते. हा सण प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो. गौराई घरी आल्यांनतर गौराईचे पूजन केले जाते. देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य केला जातो. घरातील वातावरण अगदी प्रसन्न असते.

धार्मिक मान्यतेनुसार, गौराई घरी येण्याला गौरी आवाहन म्हटले जाते. असे म्हटले जाते की, तीन दिवस देवी गौरी आपल्या माहेरी येते. महाराष्ट्रात विविध घरांमध्ये विविध पद्धतीने देवीची पूजा केली जाते. कोणी घरामध्ये देवी गौरीची प्रतिमा रूपात पूजा करतात तर कोणी मूखुट पूजन करतात. गौराईचे प्रत्येक स्वरूप तितकेच सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारे असते.

देवी गौरीला अनेकजण महालक्ष्मीदेखील म्हणतात. त्यामुळे अनेकजण गौरी पूजनला महालक्ष्मी पूजनदेखील म्हणतात. तसेच ज्येष्ठा नक्षत्रामध्ये गौरीचे पूजन केले जात असल्याने त्यांना ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते. आज आपण देवी गौराईला तीन दिवस कोणता नैवेद्य असतो याबाबत जाणून घेऊया…

 

पहिल्या दिवसाचा नैवेद्य-

पहिला दिवस म्हणजे गौरी आगमन किंवा गौरी आवाहनाचा दिवस होय. यादिवशी देवी गौराई माहेरी येते. यादिवशी नैवेद्यात अगदी पारंपरिक पदार्थ बनवले जातात. माहेरची भाजी भाकरी या नैवेद्यात असते. पहिल्या दिवशी देवीला ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, शेपूची भाजी आणि आळु किंवा पाटवडी असे पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणून बनवले जातात.

 

दुसऱ्या दिवसाचा नैवेद्य-

गौरी आवाहनाच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते. दुसऱ्या दिवशी गोडधोडाचा नैवेद्य असतो. यादिवशी पुरण पोळी, कटाची आमटी, बटाटे भाजी आणि पापड असा नैवेद्य असतो.

 

तिसऱ्या दिवसाचा नैवेद्य-

गौरी आवाहनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते. माहेरवाशीन गौराई घरातील सदस्यांना सुखसमृद्धी आणि आशीर्वाद देते. यादिवशी देवीसाठी दहीभात आणि शिरा किंवा शेवय्याचा नैवेद्य केला जातो. यादिवशी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत घरातील गणपती बाप्पासोबत देवी गौरीचीसुद्धा पाठवणी केली जाते.