MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

गणेश चतुर्थीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बनवा पंचामृत, जाणून घ्या योग्य पद्धत

पूजेमध्ये, धार्मिक कार्यांमध्ये देवाला पंचामृत दाखवून नंतर ते प्रसाद म्हणून सर्वांना दिले जाते.
गणेश चतुर्थीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बनवा पंचामृत, जाणून घ्या योग्य पद्धत

 How to make Panchamrit:   देशभरात मोठ्या उत्साहाने गणेश चतुर्थीला प्रारंभ झाला आहे. आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. घराघरात थाटामाटात बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जात आहेत. तसेच बाप्पाच्या पूजेमध्ये एक पदार्थ नक्कीच असतो तो म्हणजे पंचामृत होय. हिंदू धर्मात पंचामृतला विशेष महत्व आहे. प्रत्येक पूजेमध्ये आणि धार्मिक कार्यांमध्ये पंचामृत बनवले जाते.

प्रत्येक पूजेमध्ये, धार्मिक कार्यांमध्ये देवाला पंचामृत दाखवून नंतर ते प्रसाद म्हणून सर्वांना दिले जाते. गणेश चतुर्थीमध्येसुद्धा दररोज पंचामृत बनवले जाते आणि प्रसाद म्हणून वाटले जाते. पण अनेकांना पंचामृत बनवण्याची शास्त्रोक्त पद्धत माहिती नाही. ती पद्धत नेमकी काय आहे साहित्याचे किती प्रमाण घ्यायचे आज आपण सर्व जाणून घेऊया.

 

पंचामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

दूध- १६ चमचे

दही- ८ चमचे

मध- १ चमचा

तूप- २ चमचे

साखर- ४ चमचे

 

पंचामृत बनवण्याची योग्य शास्त्रोक्त पद्धत-

 

पंचामृत बनवण्यासाठी एका भांड्यात दूध, दही, मध, तूप आणि साखर हे सर्व पदार्थ एकत्र करून घ्यावे.

आता यावर तुळशीचे पान ठेवावे.

धार्मिक कार्यांमध्ये केले जाणारे पंचामृत तयार आहे.

 

पंचामृत करताना कोणते शास्त्रोक्त नियम पाळायचे?

 

शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत बनवल्यास आरोग्यालासुद्धा त्याचे अनेक फायदे मिळतात. कारण त्यामध्ये प्रत्येक घटकाचे योग्य प्रमाण असते.

पंचामृत बनवताना यामध्ये शास्त्रोक्त नियम असा आहे की, तुम्ही जर एक चमचा मध घेतलाय तर त्यामध्ये त्याच्या दुप्पट म्हणजेच २ चमचे तूप असावे, तुपाच्या दुप्पट म्हणजेच ४ चमचे साखर असावी. त्याच्या दुप्पट म्हणजेच ८ चमचे दही असावी आणि दह्याच्या दुप्पट म्हणजेच १६ चमचे दूध असावे. असे हे प्रमाण असते.

तसेच पंचामृत अधिक गुणकारी आणि आरोग्यदायी व्हावे म्हणून त्यामध्ये तुळशी पान अवश्य घालावे.

पंचामृत बनताना ते नेहमी चांदी किंवा काचेच्या भांड्यात बनवावे.

पंचामृत ताजे करून घ्यावे. ते जास्तवेळ ठेऊ नये पूजेनंतर लगेच वाटून द्यावे.