Bhau Kadam : कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आता ‘सिरियल किलर’ बनणार?

Asavari Khedekar Burumbadkar

नेहमी आपल्या जोशातल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडीचा किंग भाऊ कदम (Bhau Kadam) पुन्हा एकदा रंगभूमीवर धमाका करायला सज्ज झाला आहे. पण यावेळी त्याची एन्ट्री काही वेगळीच असणार आहे. ‘सिरियल किलर’ या नव्या नाटकात भाऊ कदम एका भन्नाट पात्रात दिसणार आहे.  ऐकून थोडं भयंकर वाटतंय ना? पण ही कथा आहे फुल टू कॉमेडी आणि गमतीशीर रहस्याची!

अद्वैत थिएटर्स आणि सिंधु संकल्प एंटरटेनमेंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केदार देसाई यांनी केले असून निर्मितीची धुरा राहूल भंडारे आणि प्रणय तेली यांनी सांभाळली आहे. नाटकात भाऊ कदमच्या (Bhau Kadam) जोडीला अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा हांडे आणि तेजस पिंगुळकर यांचीही धमाल जोडी पाहायला मिळणार आहे.

कधी आहे पहिला शो

‘सिरियल किलर’चा पहिला शो येत्या शनिवारी, म्हणजेच १२ ऑक्टोबरला रंगभूमीवर रंगणार आहे. कथानकाची झलक सांगायची झाल्यास, एका मालिका अभिनेत्री आणि रिपोर्टरभोवती घडणाऱ्या एका रहस्यमय घटनेपासून सगळं सुरू होतं. त्या घटनेनंतर ‘सिरियल किलर’ म्हणून ओळखला जाणारा व्यक्ती खरंच खून करणारा असतो की सगळं काही गैरसमज असतो, याभोवती नाटकाची गोष्ट फिरते. पण हे सगळं घडतं इतक्या मजेशीर पद्धतीने की प्रेक्षकांच्या हशाचा वर्षाव होणार यात शंका नाही.

हे नाटक म्हणजे निखळ मनोरंजन (Bhau Kadam)

भाऊ कदम म्हणाले, “हे नाटक म्हणजे निखळ मनोरंजनाची मेजवानी आहे. ‘सिरियल किलर’ या नावात जितका थरार आहे, तितकीच धमालही आहे. फुल टू कॉमेडी आणि आमच्या सगळ्यांच्या भन्नाट ट्यूनिंगचा एक सुंदर संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. निर्माते आणि दिग्दर्शकांनी सांगितले की अद्वैत थिएटर्स नेहमीच नाट्यरसिकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते. ‘सिरियल किलर’च्या माध्यमातून त्यांनी सस्पेन्स आणि कॉमेडीचं अनोखं मिश्रण रंगमंचावर आणलं आहे.

या नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी सजवलं आहे, संगीत विजय गवंडे यांचं असून प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांनी केली आहे. सूत्रधार म्हणून सुनील पानकर आणि गोट्या सावंत काम पाहत आहेत. थोडक्यात सांगायचं तर, ‘सिरियल किलर’ हे नाव ऐकून जरी थोडं गंभीर वाटलं तरी या नाटकातला खरा ‘किलर’ आहे हास्याचा! भाऊ कदमच्या भन्नाट कॉमेडीने भरलेला हा नवा प्रयोग प्रेक्षकांसाठी एक भन्नाट आणि वेगळा अनुभव ठरणार आहे.

ताज्या बातम्या