बॉलिवूडमध्ये हॉरर आणि कॉमेडीचं उत्तम मिश्रण म्हटलं की सर्वात आधी ‘भूल भुलैया’ मालिकेचं नाव घेतलं जातं. ‘भूल भुलैया 3’ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवून एक वर्ष पूर्ण केलं असून या खास प्रसंगी दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. त्यांनी सुपरहिट फ्रँचायझीच्या पुढील भागाची ‘भूल भुलैया 4’ ची (Bhul Bhulaiyaa 4) अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकतेची लाट उसळली आहे.
‘भूल भुलैया 4’ च्या शूटला सुरुवात (Bhul Bhulaiyaa 4)
अनीस बज्मी यांनी सांगितलं की ‘भूल भुलैया 4’च्या कामाला सुरुवात झाली असून प्रेक्षकांचा लाडका अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्यांनी पुढे म्हटलं, “जर ‘भूल भुलैया’ नसती, तर लोकांना कार्तिकचा अप्रतिम कॉमिक टायमिंग कळलाच नसता. आम्ही दोघं मिळून अजून काही कॉमेडी प्रोजेक्ट्स करण्याच्या विचारात आहोत.” ‘भूल भुलैया 2’मधील त्याच्या धमाल अभिनयामुळे कार्तिकला नवी ओळख मिळाली होती, आणि आता या नव्या भागात तो काय नवं घेऊन येईल याची सर्वांना उत्सुकता आहे.

अनीस बज्मी यांनी या मालिकेच्या यशाचं श्रेय प्रेक्षकांना दिलं. ते म्हणाले, “या फ्रँचायझीला गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी जेवढं प्रेम दिलं आहे, ते अविश्वसनीय आहे. हे फक्त चित्रपट नाहीत, तर लोकांच्या भावना आहेत. म्हणूनच आम्ही ‘भूल भुलैया 4’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे आणि कार्तिक निश्चितच या भागात असेल.”
‘भूल भुलैया 3’मध्ये दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांनी झकास भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या कामाचं कौतुक करत बज्मी म्हणाले, “माधुरी आणि विद्या दोघीही विलक्षण कलाकार आहेत. त्या वेळेच्या बाबतीत काटेकोर, अत्यंत व्यावसायिक आणि सहकार्यशील आहेत. त्यांच्या सोबत काम करणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती.” मात्र, या दोघी ‘भूल भुलैया 4’मध्ये (Bhul Bhulaiyaa 4) दिसतील का असा प्रश्न विचारल्यावर ते हसत म्हणाले, “होऊ शकतं! किंवा कदाचित एखादी नवी अभिनेत्री असेल जी या मालिकेत पहिल्यांदाच दिसेल.”
सोशल मीडियावरही अनीस बज्मी यांनी ‘भूल भुलैया 3’च्या यशाच्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी लिहिलं, “मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भूल भुलैया 3’ला प्रेक्षकांनी ज्या प्रेमाने स्वीकारलं, ते अविस्मरणीय होतं. सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांचे मनःपूर्वक आभार.” २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. भय आणि विनोद यांचं सुंदर संतुलन आणि कार्तिकचा तुफान परफॉर्मन्स हे त्याच्या यशाचं प्रमुख कारण ठरलं.
कथा अधिक भयावह असेल??
आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे की ‘भूल भुलैया 4’मध्ये काय नवं पाहायला मिळणार? कथा अधिक भयावह असेल की नव्या विनोदी ट्विस्ट्सने भरलेली? अनीस बज्मींच्या दिग्दर्शनात ही मालिका नेहमीच भय आणि हास्याचा सुंदर संगम ठरली आहे. त्यामुळे हा चौथा भागही तसाच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल अशी अपेक्षा आहे. अनीस बज्मी आणि कार्तिक आर्यन ही जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार यात शंका नाही. प्रेक्षकांसाठी ही केवळ एक फिल्म नसून, एक रोमांचक अनुभव ठरणार आहे. ‘भूल भुलैया 4’मध्ये पुन्हा एकदा भुतांचा बवाल, कार्तिकचा धमाल आणि हॉररमध्ये मिसळलेला हास्याचा तडका — तयार राहा, कारण पुन्हा सुरू होणार आहे भूलभुलैय्येचा खेळ!