Diljit Dosanjh : दिलजीत दोसांजला खालिस्तानी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी; नेमकं काय आहे प्रकरण?

Asavari Khedekar Burumbadkar

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज (Diljit Dosanjh)यांना अलीकडेच जीवघेणी धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धमकी खालिस्तानी समर्थक संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (SFJ) कडून दिली गेली आहे. SFJ या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने दिलजीतविरुद्ध तीव्र वक्तव्य करत 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियात होणारा दिलजीतचा शो थांबवण्याची धमकी दिली आहे.

कशामुळे धमकी मिळाली?

ही संपूर्ण वादग्रस्त घटना ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय टीव्ही शोच्या एका एपिसोडच्या प्रोमोमुळे घडली आहे. या प्रोमोमध्ये दिलजीत दोसांज (Diljit Dosanjh) यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या पायाला स्पर्श केला होता. 31 ऑक्टोबर रोजी हा एपिसोड प्रसारित होणार आहे. मात्र या कृतीवर SFJ संघटना संतप्त झाली असून त्यांनी त्याला शीख समाजाचा अपमान म्हटले आहे.

रिपोर्ट्सनुसार, SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की अमिताभ बच्चन यांनी 1984 मध्ये झालेल्या सिखविरोधी दंग्यांदरम्यान ‘खून का बदला खून’ अशी घोषणा करून लोकांना भडकवले होते. पन्नूंचा आरोप आहे की दिलजीत दोसांज यांनी बच्चन यांच्या पायाला स्पर्श करून त्या दंग्यांमध्ये मृत्यू पावलेल्या प्रत्येक सिख व्यक्तीचा, प्रत्येक विधवेचा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे.

सोशल मीडियावर चर्चा

सध्या या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. काही वापरकर्ते दिलजीत दोसांज (Diljit Dosanjh) यांच्या समर्थनात उतरले असून त्यांचा उद्देश केवळ आदर व्यक्त करणे इतकाच असल्याचे सांगत आहेत. तर काहींनी SFJ च्या धमकीला विरोध दर्शवला आहे आणि कलाकारांविरुद्ध हिंसेचा वापर करणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील कार्यक्रम आयोजकांनी सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधला असून दिलजीतच्या शोच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेतली जात आहे. दिलजीत दोसांज यांनी या धमकीवर अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही, परंतु चाहत्यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या