शाहरुख खानचा मजेशीर अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘मन्नत’मध्ये राहण्यासाठी एका फॅनने मागितलेली जागा आणि त्यावर शाहरुखने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा शाहरुख खान आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. नेहमीच चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी तो सोशल मीडियावर #AskSRK सत्र आयोजित करतो. अलीकडेच, आपल्या ६०व्या वाढदिवसाच्या आधी घेतलेल्या या सत्रात फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संवाद रंगतदार झाला.
शाहरुख म्हणाला मीच भाड्याने राहतोय
या सत्रात एका फॅनने विनोदी अंदाजात विचारलं, “मला मुंबईत हॉटेलमध्ये रूम मिळत नाहीये. मी ‘मन्नत’मध्ये राहू शकतो का?” या प्रश्नावर शाहरुखने आपल्या खास खट्याळ शैलीत उत्तर दिलं, “मन्नतमध्ये तर आजकाल माझ्याकडेही खोली नाही… भाड्याने राहतोय मी!!!” शाहरुखच्या या उत्तराने चाहत्यांना हसू आवरलं नाही आणि सोशल मीडियावर त्याच्या विनोदाची चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्याचं कौतुक करत लिहिलं की, ‘याच कारणामुळे शाहरुखला लोक किंग खान म्हणतात.’

‘मन्नत’ या शाहरुखच्या आलिशान बंगल्या बद्दल चाहत्यांची नेहमीच उत्सुकता असते. दरवर्षी हजारो लोक फक्त हे घर पाहण्यासाठी बँडस्टँडला भेट देतात. सध्या मात्र या बंगल्या मध्ये काही दुरुस्तीचं आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे शाहरुखने तात्पुरत्या स्वरूपात त्याच परिसरात एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतलं आहे. एका चाहत्याने विचारलं की, “यावर्षीही तू मन्नतच्या गेटवर उभा राहून चाहत्यांना अभिवादन करशील का?” त्यावर शाहरुखने मजेदार उत्तर दिलं, “नक्कीच! पण या वेळी हार्ड हॅट घालावी लागेल!
या संवादानंतर एका युजरने विचारलं की, “तू आता इंटरव्ह्यू का देत नाहीस? आम्हाला तुझे विचार ऐकायला मिळत नाहीत.” त्यावर शाहरुखने आपल्या खास ह्यूमरमध्ये उत्तर दिलं, “माझ्याकडे सांगायला काही नवीन नाही… आणि जुने इंटरव्ह्यू पण आता जुने झालेत, त्यामुळे… हा हा!” हे उत्तर ऐकून फॅन्सनी पुन्हा एकदा शाहरुखच्या बुद्धिमत्तेचं आणि विनोदबुद्धीचं कौतुक केलं.
शाहरुखचा पुढील चित्रपट कोणता?
दरम्यान, कामाच्या आघाडीवर शाहरुख खान लवकरच आपल्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘किंग’ असं असून त्याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिनेता अभिषेक बच्चनही दिसणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या #AskSRK सत्रातून पुन्हा एकदा सिद्ध झालं की शाहरुख खान केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही आपल्या चाहत्यांचा किंग आहे. त्याची साधी, विनोदी आणि मनमोकळी वृत्तीच त्याला खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात स्थान देत राहते.