बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आयुष्यातील अतिशय खास टप्प्यातून जात आहे. पती विकी कौशलसोबत ती लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहे. सध्या ती प्रसूतीपूर्व विश्रांती घेत असून, मुंबईतील आपल्या घरात कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. मात्र अलीकडेच एका मनोरंजन वेबसाइटने तिचे बाल्कनीत आराम करतानाचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो पाहताच चाहत्यांमध्ये आणि सेलिब्रिटींमध्ये संतापाची लाट उसळली.
या फोटोंमध्ये कतरिना घराच्या बाल्कनीत शांतपणे विश्रांती घेताना दिसत होती. तिच्या वैयक्तिक क्षणात हस्तक्षेप करणाऱ्या या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. चाहत्यांच्या प्रतिक्रियेनंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील पुढे येत अशा वर्तनावर तीव्र शब्दांत टीका केली.

काय म्हणाली सोनाक्षी?
सोनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिले, “तुम्हाला काय झालं आहे? एका महिलेचे तिच्याच घरात संमतीशिवाय फोटो काढून ते सार्वजनिक व्यासपीठावर शेअर करणं ही लाजिरवाणी आणि अमानुष गोष्ट आहे. तुम्ही लोक गुन्हेगारांपेक्षा काही वेगळे नाही.” सोनाक्षीच्या या वक्तव्याला अनेक कलाकार आणि नेटिझन्सनी पाठिंबा दिला. लोकांनी माध्यमांना जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
यापूर्वीही घडले असे प्रकार
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार नविन नाहीत. काही महिन्यांपूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरातील फोटो देखील त्यांच्या परवानगीशिवाय प्रकाशित करण्यात आले होते. त्यावेळी आलियानेही अशा प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा कतरिनाच्या बाबतीत असेच काहीसे घडल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
कतरिना आणि विकी कौशल यांनी या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. काही काळापूर्वी कतरिनाने तिच्या गरोदरपणाची घोषणा सोशल मीडियावर केली होती. तिने विकीसोबत एक सुंदर फोटो शेअर केला होता, ज्यात विकी तिच्या बेबी बंपकडे प्रेमाने पाहताना दिसत होता. त्या फोटोनंतर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
सध्या कतरिना तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेत असून, ती परदेशात बाळाला जन्म देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. मात्र या सगळ्या चर्चांदरम्यान तिच्या खाजगी आयुष्याचा आदर राखणे, तिच्या वैयक्तिक क्षणात हस्तक्षेप न करणे आणि माध्यमांनी जबाबदारीने वागणे गरजेचे असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले आहे. तसेच या घटनेमुळे पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांच्या गोपनीयतेबद्दलचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रसिद्धी आणि वैयक्तिक जीवन यांच्यामधील सीमारेषा नेमकी कुठे ओढायची, यावर आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.