जामनगर– महादेवी हत्तीणीला वनतारात नेल्यानंतर तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. वनताराकडून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आली आहे. माधुरी हत्तीणीला वनतारात नेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा होता, वनताराचा नव्हता, असंही स्पष्ट करण्यात आलंय. महादेवी हत्तीणीवर होत असलेल्या उपायांमुळे तिची प्रती सुधारत असल्याचंही वनताराच्या वतीनं सांगण्यात आलंय.
कोल्हापूरच्या नांदणी गावातील हत्तीण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलीय. कोल्हापूर जिल्ह्यात तिला परत आणण्यासाठी आंदोलन करण्यात येत असलं तरी सध्या ही महादेवी हत्तीण वनतारामध्ये उपाय घेते आहे. महादेवीला वनतारा मध्ये ३० जुलै २०२५ मध्ये आल्यापासून तिला विशेष पशुवैद्यक उपचारांखाली ठेवण्यात आलं.
महादेवीवर कोणते होतायेत उपचार
१. सांधेदुखीवर इलाज म्हणून रोज जल उपचार तळे.
२. एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड आदी रेडिओलॉजिकल रोगनिदान.
३. नियमित फिजिओथेरपी उपचार आणि संतुलित खाणेपिणे.
४. साखळदंडविरहित मऊ पृष्ठभागाची राहण्याची व्यवस्था
५. अन्य हत्तींबरोबर एकत्र येण्याची संधी.
या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचं प्रकृती सुधारत असल्याचं दिसून येतंय. वनतारातील कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिलीय.
महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करीत आहे. तसेच अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आहे.
कोण आहे महादेवी हत्तीण?
महादेवी ही ३६ वर्षांची आशियाई हत्तीण असून तिने गेली ३३-३४ वर्षे कोल्हापूर, नांदणी येथील श्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात काढली. तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गॅंगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या आहेत. तरीही धार्मिक प्रथा-परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये तिचा सहभाग होत होता. तिला ठेवलेल्या जागी जमिनीचा पृष्ठभाग धातुसदृश्य कडक असल्याने हे तिचे आजार आणखीनच वाढत गेल्याचं सांगण्यात येतंय.
महादेवी माधुरीला वनतारामध्ये का हलविण्यात आले ?
1. प्राणिमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली.
2. या हत्तीणीवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी नेऊन तिचे पुनर्वसन करावे, अशी समितीची शिफारस
3. 16 जुलै 2025 ला मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली
४. जामनगर येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (वनतारा) मध्ये दोन आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला.
५. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
६. 29 जुलै 2025ला सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य पिठाने ही रिट याचिका फेटाळून लावली
7. महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे, यावर भर दिला
8. महादेवीचं वनतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब केलं.
9. या हत्तीणीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे, या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतल्या.
वनताराने या हत्तीणीची निवड केलेली नाही, तर कोर्टाच्या आदेशानं या हत्तीणीला वनतारात आणण्यात आल्याचंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलंय.
वनतारा काय आहे?
वनतारा हे गुजरातच्या जामनगर मध्ये साडेतीन हजार एकरांवर पसरलेले वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे. याच्यात २,००० प्रजातींचे दीड लाख प्राणी आहेत. महत्त्वाचं म्हणजे वनतरा हे पर्यटन प्राणी संग्रहालय नाही, या ठिकाणी पर्यटकांना किंवा पाहुण्यांना प्रवेश नाही. त्यामुळं प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल तसेच त्यांना जास्तीत जास्त एकांत मिळेल याची काळजी घेतली जाते.अशाच स्वरुपाची काळजी माधुरी हत्तीणीची घेतली जात असल्याचं वनताराकडून सांगण्यात आलंय.





