MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांचा अपघात, कुंडेश्वरला जाणारी पिकअप दरीत कोसळली, 9 महिला ठार

देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांचा अपघात, कुंडेश्वरला जाणारी पिकअप दरीत कोसळली, 9 महिला ठार

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 9 महिलांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिक महिला जखमी झाल्या आहेत. खेड तालुक्यातील देवदर्शनासाठी या महिला निघाल्या होत्या. त्यावेळी हा अपघात घडला. ही घटना खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील कुंडेश्वर शिव मंदिराकडे जाताना घाट परिसरात घडली आहे.

जखमींवर उपचार सुरू 

मिळालेल्या माहितीनुसार, पापळवाडी येथील काही महिला श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी कुंडेश्वर इथं जात होत्या. कुंडेश्वरला जाताना घाटातून प्रवास करावा लागतो. यावेळी घाटात त्यांची गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातात 9 महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 20 हून अधिक महिला या जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर जखमींना तातडीनं पाईट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच, खेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं आणि पुढील कारवाई केली. श्रावण सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख

 या अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्विट करुन सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसंच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.