MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

पुणेकरांसाठी मोठी बातमी! हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार, 8 नव्या एक्स्प्रेस गाड्या धावणार!

Written by:Rohit Shinde
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. हडपसर टर्मिनलचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येथून 8 नव्या एक्सप्रेस धावतील.
पुणेकरांसाठी मोठी बातमी!  हडपसर रेल्वे टर्मिनलचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार, 8 नव्या एक्स्प्रेस गाड्या धावणार!
हडपसर टर्मिनलवर अलीकडेच दोन नवीन स्टेबलिंग लाईन तयार झाल्या असून त्या मुख्य मार्गाशी जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे पुणे स्टेशनला पर्यायी स्थानक म्हणून हडपसर टर्मिनलची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काळात हे स्टेशन सेवेत आल्यास पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा

हडपसर टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाला पर्याय म्हणून विकसित होत असलेल्या या टर्मिनलचे काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. पुणे स्थानकाच्या विकासकामामुळे हरंगुळ एक्स्प्रेससह एकूण 8 रेल्वेगाड्या हडपसर टर्मिनलवरून चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. त्यामुळे येथे सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची संख्या 11 वर पोहोचणार असून पूर्व पुण्यातील प्रवाशांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी हडपसर आणि खडकी ही दोन स्थानके टर्मिनल स्वरूपात विकसित केली जात आहेत. या दोन्ही टर्मिनलच्या उभारणीची कामे सध्या सुरू असून ती डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हडपसर टर्मिनलवर सध्या तीन फलाटांची सुविधा उपलब्ध आहे. येथून हैदराबाद एक्स्प्रेस आणि जोधपूर एक्स्प्रेस या दोन गाड्यांची नियमित धाव सुरू आहे, तर रिवा एक्स्प्रेस ही गाडी नव्याने सुरू करण्यात आली आहे. तसेच, येथून डेमू गाड्यांचीही सेवा उपलब्ध असून काही एक्स्प्रेस गाड्यांना हडपसर टर्मिनलवर थांबा देण्यात आला आहे.

नव्या 8 एक्स्प्रेस हडपसरमधून धावणार!

हे टर्मिनल पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर लवकरच पुणे रेल्वे स्थानकाचा विकास आणि रिमॉडेलिंग सुरू होणार असून त्या काळात काही एक्स्प्रेस गाड्या इतर स्थानकांवर हलवाव्या लागतील. त्यात हरंगुळ एक्स्प्रेससह आठ गाड्या हडपसर टर्मिनलवरून धावतील. सध्या येथे जोधपूर, हैदराबाद, रिवा एक्स्प्रेस आणि डेमू सेवा सुरू आहेत. दररोज ६ ते ७ हजार प्रवासी हडपसरहून प्रवास करत आहेत. त्यामुळे हा रेल्वेतील मोठा बदल ठरेल.