महायुतीत गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेला खल अखेर संपून मुंबई महनगर पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यातही काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा महायुतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वतंत्र लढले तरी निवडणुकीनंतर त्या त्या ठिकाणी पुन्हा एकत्र येणार असं ठरल्याचीही सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नेमकं काय होणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. अशा एक मोठी बातमी खरंतर समोर येताना दिसत आहे.
भाजप, राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार?
पिंपरी चिंचवड शहरात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण दोन्ही पक्षातील नेत्यांनी स्वबळाची भाषा करत दंड थोपटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये आत्तापासूनच फूट पडण्यास सुरूवात झाली आहे. दुसरीकडे अजित पवारांना दूर ठेवण्यासाठी 2017 प्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपने स्वबळाचा नारा देत नवा डाव टाकल्याचं बोलले जात आहे.

अजितदादांनी सत्तेसाठी कंबर कसली!
गेली अनेक दशके पिंपरी चिंचवड महापालिकेवर असलेली अजित पवारांची सत्ता हातून गेल्याने यंदाच्या पालिका निवडणुकीमध्ये, पराभवाची सल भरून काढण्यासाठी अजित पवार स्वतःच मैदानात उतरले आहेत . तर दुसरीकडे ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष ठेवून आहेत .काही दिवसांपूर्वीच तटकरे यांनी खोपोलीमध्ये पिंपरीतील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यासंदर्भात आखणी केल्याची माहिती आता पदाधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय गणितं खऱ्या अर्थाने बदलायला सुरुवात झाली होती. 2017 मध्येच राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये विलीन झाले. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल का आणि ते चेहरे मतदार स्वीकारतील का याकडे सर्वांच लक्ष आहे.











