छठपूजा हा उत्तर भारतीयांचा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण आहे. विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पूर्व उत्तर भारतात या सणाला मोठे स्थान आहे. सूर्यदेव आणि छठी मातेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. या पूजेदरम्यान भक्त चार दिवस उपवास, स्नान आणि सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा पाळतात. मुंबईतील उत्तर भारतीय समाजासाठी छठपूजा हा त्यांच्या संस्कृतीशी जोडणारा एक भावनिक दुवा आहे. अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेकडून छठपुजेसाठी तशी विशेष तयारी करण्यात आली आहे.
छठपुजेसाठी BMC कडून विशेष व्यवस्था
छठपूजेसाठी मुंबई महानगरपालिकेकडून विविध सुविधा, उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 67 ठिकाणी छठपूजेसाठी नियोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी छठपूजा साजरी होणार आहे.
छठपूजा आयोजित करणाऱ्या संस्था / मंडळांना आवश्यक परवानग्या आणि समन्वयासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पोलीस आणि वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था उभारली !
समुद्र किनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगरे मिळून सुमारे 67 ठिकाणी छठपूजेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ आणि सुरक्षित असे एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव / टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव / टाक्यांपैकी सर्वाधिक तलाव आणि टाक्या ह्या घाटकोपर परिसरात (एन विभाग) 44, दहिसर (आर उत्तर विभाग) 22 तर कांदिवली परिसरात (आर दक्षिण विभाग) 16 इतक्या आहेत. यासह उर्वरित ठिकाणी देखील कृत्रिम तलाव व टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे
छठपूजेच्या काळात अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, वाहने व साधनसामग्री उपलब्ध राहतील. पूजा स्थळांवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व धूम्रफवारणी यावर भर दिला जाणार आहे. सर्व पूजास्थळांवर पुरेशा प्रमाणात निर्माल्य कलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सर्व ठिकाणी पूजेसाठी आवश्यकतेनुसार टेबल व खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सवासाठी 403 वस्त्रांतरगृह (चेंजिंग रूम्स) उभारण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
उत्सवस्थळी पिण्याच्या पाण्याची तसेच प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. छठपूजेच्या काळात सर्व उपाययोजना योग्य रितीने राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित अधिकारी नियमितपणे क्षेत्र भेट देतील.
छठपुजेमागे उत्तर भारतीयांची काय धारणा?
छठपूजेमागे उत्तर भारतीयांची अत्यंत श्रद्धेची आणि आध्यात्मिक अशी धारणा आहे. त्यांच्या मते, सूर्यदेव हे जीवन, आरोग्य आणि समृद्धीचे अधिष्ठाता देव आहेत. सूर्यदेव आणि छठी मातेची उपासना केल्याने कुटुंबात आनंद, आरोग्य आणि भरभराट येते, अशी श्रद्धा आहे. या पूजेदरम्यान उपवास, शुद्धता आणि संयम पाळले जातात. भक्त सूर्यास्त आणि सूर्योदयाला अर्घ्य देऊन देवतेचे आशीर्वाद मागतात. स्त्रिया विशेषतः आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी ही पूजा करतात. छठपूजा ही फक्त धार्मिक परंपरा नसून ती शुद्धता, भक्ती आणि निसर्गाशी एकात्मता दर्शवणारी एक महान सांस्कृतिक परंपरा मानली जाते.
टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.





