बहुप्रतिक्षित अशा मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे. निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. इच्छुकांचा जीव आता टांगणीला लागला आहे.
बीएमसीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया
मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर आता आरक्षण सोडतीकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे. 11 नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनाला दिले आहेत. या आरक्षण सोडतीवर 20 नोव्हेंबर पर्यंत हरकती मागवल्या जाणार असून, 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने पालिका प्रशासनाला दिले आहेत.

आरक्षण सोडत कधी निघणार याकडे अनेक माजी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. या संदर्भात आरक्षण सोडतीचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यामुळे हरकतींच्या सोडवणुकीनंतर 28 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेचे अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.
भावी नगरसेवकांचा जीव टांगणीला !
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानतर मुंबई महापालिकेवर प्रशासकच आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. २२७ प्रभाग रचना अंतिम होऊन त्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षण सोडतीकडे अनेकांचे लक्ष आहे. 227 प्रभागांपैकी 17 प्रभाग हे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी सुरुवातीपासूनच राखीव आहेत. त्यामुळे उर्वरित 210 प्रभागांतून ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. मुंबईतील राजकीय समीकरणांना यामुळे वेग येणार आहे.











