महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबत वादाच्या व्हिडीओमुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी, अजितदादांची काय पोस्ट?

राजकीय नेते विरुद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी हा वाद तसा काही नवा नाही. यामुळं अनेक अधिकारी राज्य आणि देशपातळीवर चर्चेतही राहिलेले आहेत.

मुंबई- सोलापूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खननावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्यातील वादाचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसतायेत. कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार कर्तव्य करु पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश कसे देतात, असा सवाल उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. तर उद्देश हस्तक्षेपाचं नव्हता, असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. सरकारच्या पातळीवरही सारवासारव होतेय, तर दुसरीकडे आयपीएस अधिकारी कृष्णा यांच्याविरोधात युपीएससीकडे दाद मागण्यात आलीय.

कर्तव्यकठोर, प्रशासनावर पकड असलेले आणि सरकारी अधिकाऱ्यांवर वचक असलेले नेते अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनमानसात ओळख. निकृष्ट कामावरुन अधिकाऱ्यांची जाहीर झाडाझडती घेणारे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची ओळख आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडीओ कॉलवरुन झालेल्या वादानं अजितदादांची ही प्रतिमाच वादात सापडलीय.

नेमका काय घडला प्रकार?

रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर मुरुम उत्खननाच्या तक्रारीवर कारवाईसाठी डीएसपी अंजली कृष्णा माढा तालुक्यात कुर्डू गावात पोहचल्या. गावकरी आणि अधिकाऱ्यांत वाद झाला, यावेळी एका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री बोलत असल्याचं सांगत अंजली कृष्णा यांना काम थांबवण्याचे आदेश दिले. मात्र अजित पवारच बोलतायेत कशावरुन असा सवाल करत अधिकारी अंजली कृष्णा यांनी त्यांना स्वताच्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितलं.

यावर संतापलेल्या अजित पवारांनी कारवाईचा इशारा देत अंजली कृष्णा यांना व्हिडीओो कॉल केला.

कारवाी थांबवून तहशीलदारांशी चर्चा करण्याचे निर्देश दिले. अजितदादा आणि या महिला अधिकाऱ्यांतील संभाषणाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

विरोधकांकडून अजित पवार टार्गेट

या घटनेनंतर राजकारण रंगलं नसतं तरच नवल. काँग्रेस, ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणावरुन अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलंय. कोणतीही कारवाई थांबवण्याचा उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नाही. यातून प्रशासनाला चुकीचा संदेश जातो, अशी टीका काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केलीय. तर शिस्तीचा नेता म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आपले कर्तव्य करू पाहणाऱ्या महिला अधिकाऱ्याला कसे झापतात पाहा, असं लिहित ठाकरे शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी अजित पवारांवर टीका केलीय. संजय राऊतांनीही या मुद्द्यावरुन अजितदादांना कुठे गेली तुमची शिस्त असा सवाल करत राजीनाम्याची मागणी केलीय.

15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल, स्थानिकांचं काय म्हणणं?

या सगळ्या वादानंतर अवैध गौण खनिज उत्खनन करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुर्डू गावातील संबंधित व्यक्तींविरोधात हे गुन्हे दाखल झालेत. ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवारांना फोन केला, त्यांच्यावरही आता कारवाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत होता आणि त्याबाबतची ग्रामपंचायतीतील सर्व कागदपत्रं असतानाही आयपीएस कृष्णा यांच्याकडून कारवाई करण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाल्याचा दावा करत गुन्हे मागे घेण्याची मागणी होतेय.

सरकारकडून सारवासारवीचे प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला अधिकारी अंजली कृष्णा यांच्यातील वाद समोर आल्यानंतर आता सारवासारवीचे प्रयत्न होतायेत. अजित पवारांनी काम थांबवण्याचे आदेश दिले नाहीत, तर शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, असं सांगितल्याचं अजित पवार राष्ट्रवादीचे नेते सांगतायेत. तर अजित पवार चुकीच्या कामासाठी फोन करत नाहीत, असं सांगत महसूलमंत्री चंद्रशेखर बानकुळेंनीही त्यांची पाठराखण केलीय.

अंजना कृष्णा यांच्याविरोधात तक्रार

आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. अमोल मिटकरी यांनी लिहिलेल्या या पत्रावर अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, अजित पवारांच्या चौकशीची मागणी केलीय.

अजित पवारांचं काय स्पष्टीकरण ?

या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिलीय. महिला अधिकाऱ्यांबाबत आदर असल्याचं सांगत, कायद्याप्रमाणे कठोर कारवाईसाठी प्रतिबद्ध असल्याचं अजित पवार म्हणालेत

हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता- अजित पवार

माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.

कोण आहेत अंजना कृष्णा?

या सगळ्या प्रकरणात कारवाईसाठी आग्रही असलेल्या आणि थेट उपमुख्यमंत्र्यांना प्रतिप्रश्न करणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा या चर्चेत आल्यात.

1. आयपीएस अंजना कृष्णा सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात डीएसपी
2. अंजली कृष्णा 2023 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी
3. अंजना कृष्णा मूळ केरळच्या तिरुअनंतपुरमच्या रहिवासी
4. वडिलांचा कापड दुकानाचा लहान व्यवसाय, आई न्यायालयात टायपिस्ट
5. नीरमंकरा येथील महाविद्यालयातून अंजना यांचं बीएससी गणितापर्यंत शिक्षण
6. यूपीएससी सिव्हिल परीक्षेत देशात 355 व्या क्रमांकान उत्तीर्ण
7. प्रामाणिक, निश्चयी आणि कुशाग्र महिला अधिकारी अशी ओळख

कुणावर कारवाई होणार?

राजकीय नेते विरुद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी हा वाद तसा काही नवा नाही. यामुळं अनेक अधिकारी राज्य आणि देशपातळीवर चर्चेतही राहिलेले आहेत.

या प्रकरणात राजकीय व्यवस्था विरुद्ध कर्तव्यदक्ष अधिकारी या वादात, एका कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्र्यांचा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याशी झालेला हा सामना त्यामुळेच चर्चेचा विषय ठरलाय. अजितदादांच्या स्पष्टीकरणानंतर आता या प्रकरणात भविष्यात कुणावर कारवाई होणार का, हे पाहावं लागणार आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News