MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

पुढील 24 तासांत राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी!

Written by:Rohit Shinde
राज्याच्या बहुतांश भागात पावासाची तीव्रता पुन्हा एकदा वाढणार असे चित्र सध्या दिसत आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांत राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी!

महाराष्ट्रातील पावसाची तीव्रता पुन्हा एकदा वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीत राज्यात पावसाची सक्रियता टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीक्षेत्राला या पावसाचा काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तविला ते सविस्तर जाणून घेऊ…

विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा अंदाज

विदर्भातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे त्या जिल्ह्यातील आहेत. तर पूर्व विदर्भातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. विदर्भातील ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भात 13 ऑगस्टपासून 19 ऑगस्टपर्यंत जोरदार आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या सातही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.

मुंबईसह कोकणाला पावसाचा इशारा

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबईचे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सियस आणि किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सियस असेल. 13 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरांसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?

तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसह कोल्हापूरच्या घाट भागाला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यनगर जिल्ह्यासाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगावी, पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.