राज्यात मान्सूनने विक्रमी वेळेत हजेरी लावली आहे. मान्सून पावसाने 10 दिवस आधीच हजेरी लावली असून, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकी राज्यभरात पावसाची स्थिती आज काय राहणार आहे, याबाबत आपण हवामान विभागाचा अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊ…
तळकोकण, पश्चिम महाराष्ट्राला इशारा
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांत मान्सून दाखल झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या भागात आज तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागात ढगाळ वातावरण असून पुरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र सध्या आहे.
मुंबई, ठाणे, पालघरला धोका
26 मे रोजी मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहरात विजेच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस राहील, तर आर्द्रता सुमारे 80 टक्केपर्यंत जाईल. वाऱ्याचा वेग अंदाजे 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे. पावसाचा काही भागांतील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. नवी मुंबईत पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता सुमारे 86 टक्क्यांवर राहणार आहे. काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
पालघर जिल्ह्यात आज आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग सुमारे 40 ते 50 किमी प्रतितास राहील, तर हवेतील आर्द्रता सुमारे 79 टक्के असेल. किनारपट्टी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.ठाणे जिल्ह्यात आज ढगाळ हवामान राहणार असून, पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.
विदर्भ, मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज
विदर्भ आणि मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण राहणार आहे, मात्र या भागातील बहुतांश जिल्ह्यांत तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, अकोला या भागात तुरळक पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील अहिल्यानगर, बीड जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करणम्यात आलं आहे.