राज्यात गणेश चतुर्थीच्या काळात पावसाचे जोरदार कमबॅक पाहायला मिळणार आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाध्याला हवामान विभागाने ऑरेन्ज अलर्ट दिला आहे तर, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह संपूर्ण कोकणसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच मराठवाडा आणि विदर्भात देखील तुरळक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सविस्तर जाणून घेऊ…
मुंबईसह कोकणात मुसळधारेचा अंदाज
गणरायाचे आगमन झाले असून उत्साहपूर्ण सोहळा सुरू असताना पावसानेही आपली उपस्थिती दाखवली आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार सरींचा अनुभव येत होता, मात्र आज मुंबईत हवामान तुलनेने स्थिर आहे. तरीदेखील ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच कोकण किनाऱ्यावरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. ठाणे आणि नवी मुंबई भागासाठी आज हवामान खात्याने यलो अलर्ट जाहीर केला आहे. सकाळपासून हलका रिमझिम पाऊस सुरू असून दुपारी सरींची तीव्रता थोडी वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनाऱ्यावरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने या तिन्ही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट घोषित केला आहे. सकाळपासून काही ठिकाणी मुसळधार सरी पडत असून दुपारनंतर पावसाची तीव्रता आणखी वाढू शकते.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज
पुढील तीन दिवस म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील 16 राज्यांमध्ये पाऊस बरसणार!
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रासोबतच पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळीय वाऱ्यांचा प्रभाव यामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होत आहे. मान्सून ट्रफ सध्या त्याच्या सामान्य स्थितीजवळ असून याचा परिणाम म्हणून देशाच्या बहुतेक भागांत पाऊस वाढला आहे. एकूणच, देशातील १६ राज्यांमध्ये पुढील दोन ते पाच दिवसांपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.





