MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

कोकण आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Written by:Rohit Shinde
राज्यात पुढील काही दिवसात 17 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
कोकण आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज; पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे, राज्यात पुढील काही दिवसात 17 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. 16 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज विशेषतः कोकण किनारपट्टीसाठी ऑरेन्ज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज संपूर्ण कोकणात दिसण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस म्हणजेच 21 ऑगस्ट 2025 पर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा आणि गडगडाटासह अधूनमधून 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आज मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, काही ठिकाणी तर अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून कोकणासह घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात विशेषतः मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरंतर नागरिकांना या काळात काळजी घ्यावी लागेल नदीकाठ आणि समुद्र किनारी भागातील नागरिकांना यामध्ये विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.