सप्टेंबर महिना चालू झाला आहे. या महिन्यातही पावसाचा असाच कहर चालू राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असतानाच आता हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे. ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने तडाखा दिल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकरांना जोरदार पावसाचा सामना करावा लागू शकतो. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी बुधवारपासून शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि वादळाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याच्या माहितीनुसार, गुरुवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर रायगड जिल्ह्यासाठीही तीन दिवस ऑरेंज अलर्ट लागू असेल. मागील काही दिवसांपासून मुंबईत अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत सांताक्रूझ वेधशाळेत 7.4 मिमी तर कुलाबा किनारी वेधशाळेत 3.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. मंगळवारी कोणताही इशारा देण्यात आला नव्हता, मात्र बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. हवामान निरीक्षक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले की बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा बदल होत आहे.
बंगालच्या खाडीत निर्माण झालेली ही प्रणाली पुढील 24 तासांत वायव्य दिशेने सरकेल आणि त्यामुळे कोकणासह मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा राहणार?
भारतीय हवामान विभागाने संपूर्ण सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा असेल, याचा एक अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पावसाबाबतही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा महिना महाराष्ट्रासाठी महासंकटाचा असेल की दिलासादायक असेल हे समोर आले आहे. समोर आलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार सप्टेंबर 2025 मध्ये देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही राज्यांची चिंता वाढणार आहे. तर काही राज्यांसाठी चिंताजनक स्थिती नसली तरी काळजी घ्यावी लागणार आहे.
ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिण भारतातील अनेक भाग, उत्तर भारताच्या काही भागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे शेतीपिकाच्या नुकसानीचा फार काही धोका नसेल. महाराष्ट्रातील पावसाबद्दलही हवामान विभागाने सांगितले आहे. या अंदाजानुसार राज्यातील पाऊस समाधानकारक असण्याची शक्यता दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये संपूर्ण देशभरात मासिक सरासरी पाऊस 109 टक्के असण्याची शक्यता आहे.





