MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

पुढील 4 दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासाठी अलर्ट

Written by:Rohit Shinde
आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पुढील 4 दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज; विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासाठी अलर्ट

महाराष्ट्रात श्रावणाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. मात्र, गणेशोत्सवाच्या आगोदरच उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. आज, 26 ऑगस्ट रोजी हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवला ते सविस्तर जाणून घेऊ…

26 ते 29 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते. याउलट गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळल्या. हा पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात राज्यभर पावसाची तीव्रता वाढेल. विशेषतः दक्षिण कोकणात आजपासून ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार व बुधवारी उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पाऊस बरसणार!

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनच्या प्रभावामुळे ईशान्य मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे 25 ते 30 ऑगस्टदरम्यान कोकण व गोवा येथे मुसळधार पावसाचा इशारा आहे. तसेच 27 ते 30 ऑगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडू शकतो. 28 ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर गुजरातमध्येही या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना खऱ्या अर्थाने सतर्कता बाळगावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील या काळात सतर्क असणार आहे.