MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

कोकणात पावसाचा जोर कायम राहणार; उर्वरीत महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, हवामान विभागाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
सद्यस्थितीला राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कोकणात मात्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहणार आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पाऊस विश्रांती देईल.
कोकणात पावसाचा जोर कायम राहणार; उर्वरीत महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले होते, पण आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. आज 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात पावसाने उसंत घेतली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीला यलो अलर्ट जारी केला आहे, तर पुणे घाटमाथ्याला पावसाचा अलर्ट दिला आहे. या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होण्याची अपेक्षा आहे.

आजचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पावसाची तीव्रता ओसरू लागली असली तरी कोकणात पावसाचे बळ कायम राहणार आहे. येत्या काही तासांसाठी ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चला जाणून घेऊया, 22 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहणार आहे. 22 ऑगस्ट रोजी मुंबई शहर व उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून, ठिकठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळू शकतात. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात पावसाचा जोर ओसरला!

पुणे शहरात आकाश आंशिकपणे ढगाळ राहण्याचा अंदाज असून हलक्या सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. नाशिकमध्ये कमाल तापमान अंदाजे 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान सुमारे 22 अंश सेल्सिअस राहील. नागपूरमध्येही 22 ऑगस्ट रोजी आकाश बहुतेक वेळा ढगाळ राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार असला तरी नागपूर शहर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 24 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील काही जिल्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील काही दिवसांमध्ये ढगफुटी थांबून उन्हाची चाहूल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाची शक्यता असणाऱ्या भागात नागरिकांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.