MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

विदर्भात पाऊस थंडावला; उष्णता वाढली, पुढील काही दिवसांचे हवामान कसे असेल?

Written by:Rohit Shinde
विदर्भात पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमी असून, ढगाळ वातावरण आणि वाढलेलं तापमान कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात पाऊस थंडावला; उष्णता वाढली, पुढील काही दिवसांचे हवामान कसे असेल?

राज्यभरातील मान्सूनच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. विदर्भात पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमी असून, ढगाळ वातावरण आणि वाढलेली उष्णता कायम राहणार आहे. उकाड्यामुळे शारीरिक त्रास जाणवण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, काही भागांत विजांसह, हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत विदर्भातील पावसाची स्थिती काय आहे, ते सविस्तर समजून घेऊ…

विदर्भात पावसाची विश्रांती; तापमानात वाढ!

विदर्भासह नागपुरात गेले दोन दिवस पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. आकाशात ढग असूनही पावसाचा मागमूस नाही, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी नागपुराचं कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सियस नोंदवलं गेलं, जे सरासरीहून २.६ अंशांनी अधिक आहे. हवामान विभागानुसार, पुढील सात दिवस विदर्भात असाच उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव येणार आहे.

पावसाच्या अनुपस्थितीमुळे विदर्भात उष्णतेचा जोर वाढत चालला आहे. दिवसाढवळ्या उकाडा आणि रात्रीही दमटपणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार ढगाळ वातावरण निर्माण होत असलं, तरी पाऊस काही कोसोंवर थांबतो आहे.

विदर्भातील खरिप हंगामा धोक्यात!

पावसातील अनियमिततेमुळे विदर्भातील खरिप हंगामाला धोका निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गातही चिंतेचं वातावरण आहे, कारण खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला नियमित पाऊस सध्या नाहीसा झालेला आहे. बंगालच्या उपसागरात सध्या कोणतेही प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाच्या हालचाली थांबल्या आहेत. त्याशिवाय, मान्सूनी वारे उत्तरेकडच्या दिशेने, हिमालयाच्या दिशेने सरकले आहेत. त्यामुळे मध्य भारत आणि विदर्भातील पावसाची शक्यता अधिकच कमी झाली आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

काही भागांमध्ये स्थानिक ढगांच्या कारणाने हलक्याशा सरी पडू शकतात. मात्र, जोरदार किंवा व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमीच असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. विशेषतः दैनंदिन गरजा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि नागरिकांना पाण्याच्या योग्य नियोजनाचे आवाहन प्रशासनाने केले आहे.