मराठा समाजासाठी 20 कलमी मराठा लग्न आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात संत-महंत आणि समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थिती या आचारसंहितेची शपथ देण्यात आली. मराठा समाजाने लग्न ात वारेमाप खर्च टाळावा, प्री वेंडिंग शूट, डीजे, हुंडा, सत्कार, भाषणे यांना फाटा द्यावा. लग्नानंतर मुलीच्या आईने सतत फोन करून मुलीच्या संसारातील हस्तक्षेप टाळावा. या आणि अशा अनेक मुद्द्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आचारसंहितेत नेमके काय?
लग्न सोहळा ३०० ते ५०० लोकांच्या उपस्थित व्हावा, प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये, लग्न वेळेवरच लावावे. लग्नात डीजे नको. पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. वरमाला घालताना नवरा-नवरीला उचलू नये, लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये. असे नियम करण्यात आले आहेत.
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मोठा निर्णय
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर धळपट्टी आणि चुकीच्या प्रथा पडत असलेले विवाह सोहळे चर्चेत आले होते. त्याविरोधात समाज एकवटला असून विवाह सोहळ्यांसाठी ठिकठिकाणी आचारसंहिता तयार करण्यात येत आहे. या अनुषंगाने अहिल्यानगर येथे रविवारी मराठा लग्न आचारसंहिता संमेलन भरवण्यात आले होते. या ठिकाणी या आचारसंहितेवर शिक्कामोर्तब करण्यात आला.
जुन्या चांगल्या प्रथा-परंपरा पुढे सुरू ठेवल्या पाहिजेत. मात्र, काही घटक चुकीच्या प्रथा आपल्या लग्न समारंभात घुसवू पहात आहेत. त्यांचा यामागील हेतू ओळखून मराठा समाजाने आपली आचारसंहिता ठरवून ती पाळली पाहिजे. अशी भूमिका या निमित्ताने मांडण्यात येत आहे. समाजातून या आचारसंहितेला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





