संजय राऊतांची तब्येत बिघडली; पंतप्रधानांकडून दखल, ट्वीट करत मोदी म्हणाले….

संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊत यांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.  या घटनेची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेण्यात आली आहे. त्यांनी राऊतांची तब्येत बरी व्हावी, अशा भावना व्यक्त केल्या आहेत…

राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी…

संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हणतात. गेल्या काही वर्षांपासूनच्या घडामोडींनी हे दाखवून दिलंच आहे. कित्येक वर्षे एकमेकांसोबत राहणारे पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यात कटुता आली. परंतु, मोदींच्या ट्वीटमुळे राजकारण वेगळ आणि मैत्रिपूर्ण संबंध वेगळे अशी चर्चा होत आहे.

संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड ?

संजय राऊतांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहावं लागणार आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत मिसळण्यास आणि बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मी लवकरच बरा होऊन नवीन वर्षात सर्वांना भेटेन, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांनी राजकारणापासून ब्रेक घेणे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील सध्या चिंतेचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

राऊतांची गैरहजेरी; ठाकरेंसाठी डोकेदुखी

संजय राऊत हे शिवसेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जातात. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केल्यापासून संजय राऊत हे सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात आणि विरोधकांवर आगपाखड करण्याचे काम संजय राऊत एकहाती करत असतात.

संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ठाकरे गटासाठी अक्षरश: एकहाती खिंड लढवली आहे. दररोज सकाळी नियमाने पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडतात. अशा परिस्थितीत ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊत सार्वजनिक, राजकीय जीवनापासून दूर राहिले, तर याचा मोठा फटका खरंतर ठाकरेंच्या शिवसेनेला बसणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News