राज्यभरात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र बघायला मिळाले. कालही सर्वदूरपर्यंत पाऊस होता. आज पावसाचा जोर ओसरताना दिसत आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, अकोला, वाशिम, यवतमाळ परिसरात पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील काही भागांमध्ये म्हणावा तसा पाऊस अजूनही झाला नसल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यामुळे मराठवाड्यात मोठा पाऊस कोसळणार कधी? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे.
कोकण-विदर्भात आज पावसाचा अंदाज
हवामान खात्याकडून काही भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला. कोकण, विदर्भामध्ये आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक शहरांमधील रस्त्यावर पाणी साचले. रविवारी सकाळीच पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळाले आणि साधारपणे कमी जास्त करत 24 तास पाऊस अनेक भागांमध्ये होता.
कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला. पुणे विभागातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट आहे. कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मुंबई आणि पुण्यातही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला नाही. त्यामुळे एकंदरीतच सद्यस्थितीला राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा कायम
पुढील दोन दिवसात हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. घाट विभागात मात्र पावसाचा जोर कायम राहणार असल्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत चांगल्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. काही भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
दरवर्षीपेक्षा यावेळी राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला. सध्या वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस सुरू आहे. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस सुरू असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. राज्यात यंदा पाऊस चांगला राहण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे शेवटच्या काळात पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची सरासरी भरून निघते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





